महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विस्फोट; चोवीस तासात ५० हजार रुग्ण आढळले

- २७७ जणांचा बळी

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या साथीचा मोठा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे. शनिवारी चोवीस तासात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हजारांजवळ पोहोचली, तसेच २७७ जणांचा या साथीने बळी गेला. याआधी शनिवारी सकाळी कंेंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार देशभरात चोवीस तासात कोरोनाच्या ८९ हजार १२९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तसेच ७१४ रुग्ण दगावले. देशभरात सापडलेल्या नव्या कोरोना रुग्णांपैकी साठ टक्के रुग्ण महाराष्ट्रात होते. देशभरात एका दिवसात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांचा हा सहा महिन्यातील उच्चांक ठरला.

देेशात कोरोनाच्या नव्या लाटेमुळे काही राज्यांमध्ये परिस्थिती बिकट होत चालली आहे. यामध्ये सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्रात असून चोवीस तासात आढळत असलेल्या कोरोनाच्या रुग्ण संख्येबाबत नवे उच्चांक होत आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेने शिखर गाठले असताना महाराष्ट्रात एका दिवसात जेवढे रुग्ण आढळत होते, त्याच्या दुप्पट रुग्ण आता सापडत आहेत. शनिवारी महाराष्ट्रात ४९ हजार ४४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, अहमदनगर, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळत असून या जिल्ह्यांचा देशातील कोरोनाचे सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असलेल्या देशांमध्ये समावेश आहे. शनिवारी मुंबई पालिका क्षेत्रात ९ हजार ९० रुग्णांची नोंद झाली आहे, तसेच २७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात ४९३४ नवे कोरोनाबाधीत आढळले आहेत आणि १९ जणांचा बळी गेला आहे. पुणे मंडळात ९ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली. यातील पुणे शहरातच ५ हजार ७२० नवे रुग्ण आढळले आहेत, तसेच ३५ जण दगावाले आहेत. नागपूर शहरात ३२७० नवे रुग्ण आढळले आहे, तर ४७ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नागपूरमधील परिस्थिती सर्वात वाईट असून येथे मृत्युचे प्रमाण जास्त आहे. नागपूरमध्ये दर तासाला दोन जण कोरोनाने दगावत आहेत.

सध्या महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह केसेसची सख्या ४ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. यातील सुमारे मुंबईत ६१ हजार, पुण्यात ७३ हजार, ठाण्यात ४९ हजार, नागपूरमध्ये ५२ हजार, नाशिकमध्ये ३२ हजार ऍक्टिव्ह केसेस आहेत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णांलयांमध्ये बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडून कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी वारंवार कडक निर्णय घेण्याचे संकेत देण्यात येत आहेत.

दरम्यान, शनिवारी पहिली ते आठवीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मुलांना परिक्षेशिवाय पुढील वर्गात पाठविण्यात येणार आहे. तसेच राज्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात येणार असून केंद्र सरकारकडे १.३ कोटी लसींची मागणी करण्यात आली आहे.

leave a reply