देशभरात कोरोनाच्या लसीकरणाची सुरूवात

नवी दिल्ली – कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर, पहिल्याच दिवशी १.९१ लाख जणांना ही लस देण्यात आली. हे लसीकरण सुरू झालेले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या विरोधातील या युद्धात देशाने गमावलेल्या वैद्यकीय कर्मचार्‍यांचे भावपूर्ण स्मरण केले. संकटाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील कितीतरी जण घरी न जाता सेवा करीत होते. यातले काहीजण तर आपल्या घरी पोहचू शकले नाही. त्यांचे कृतज्ञतापूर्ण स्मरण करून वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणार्‍या प्रत्येकाला ही लस पोहचविली जात आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

सार्‍या जगाची नजर खिळलेल्या भारतातील कोरोनाच्या लसीकरणाच्या या मोहिमेची शनिवारपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी १,९१,१८१ जणांना ही लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही लस सुरक्षित असल्याची ग्वाही देखील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी ही लस म्हणजे कोरोनाच्या विरोधातील लढ्यात देशाने मिळविलेला विजय असल्याची घोषणा केली. ही लस मिळाल्यानंतरही देशबांधवांनी मास्क परिधान करावा व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

कोरोनाची साथ येण्याच्या आधीच भारताने सावधानता दाखविली होती. ही साथ धडकल्यानंतर देखील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस यांनी आपले कर्तव्य पार पाडले. यासाठी ते कित्येक दिवस घरीही गेले नव्हते. यातील काहीजण आपल्यापासून कायमचे दुरावले, अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली. इतरांचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना पहिल्यांदा ही लस पुरवून आम्ही त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.

भारताने ज्या प्रकारे या साथीचा मुकाबला केला, त्याला सार्‍या जगातून दाद दिली जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी, स्थानिक प्रशासनांनी, सरकारी व सामाजिक संस्था यांनी एकजुटीने कसे काम करता येऊ शकते, याचे उदाहरण सर्वांसमोर उभे केले, असे सांगून पंतप्रधानांनी त्यावर समाधान व्यक्त केले. चीनमध्ये कोरोना वेगाने फैलावत असताना, पाकिस्तानने आपल्या नागरिकांना तसेच सोडून दिले होते. पण भारताने मात्र चीनमध्ये अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना मायदेशी आणले, याचीही आठवण पंतप्रधानांनी करून दिली. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी टेस्टिंग लॅब उपलब्ध नव्हती. अशावेळी भारताने या देशाला टेिस्टिंग लॅब भेट स्वरुपात दिली व या देशातील भारतीयांमा मायदेशी आणले होते, याचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला.

प्रचंड लोकसंख्या ही कोरोनाच्या विरोधातील युद्धात भारताची कमकुवत बाजू ठरेल, असे दावे जगभरात केले जात होते. पण भारताने यालाच आपली शक्ती बनविलेले आहे. देशात कोरोनाच्या दोन लसी तयार झाल्या आहेत. यामुळे जगभरात भारताचे वैज्ञानिक, वैद्यकीय व्यवस्था यांची जगभरातील विश्‍वासार्हता वाढलेली आहे. हा विश्‍वास भारताने संपादन केलेला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. वैज्ञानिक व तज्ज्ञ कोरोनाच्या लसीच्या प्रभाव व सुरक्षेबद्दल आश्‍वस्त झाले, त्यानंतरच या लसीच्या इर्मजन्सी वापरासाठी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे जनतेने अफवा व अपप्रचारावर विश्‍वास ठेवू नये, असा संदेश पंतप्रधानांनी दिला आहे.

परदेशी लसींच्या तुलनेत भारतीय लसी स्वस्त व सहजपणे वापरता येण्याजोग्या आहेत. काही परदेशी लसी इतक्या सोपेपणाने वापरता येणार्‍या नाहीत. तसेच त्यांची किंमत सुमारे पाच हजार रुपये इतकी आहे. याबरोबरच सदर लसी उणे ७० डिग्री इतक्या तापमानात ठेवाव्या लागतात. मात्र भारतात तयार झालेल्या लसी अशा नाहीत. देशातील वातावरणात या लसींची वाहतूक करता येणे सहजशक्य आहे, असे सांगून पंतप्रधानांनी ही लस तयार करणार्‍या संशोधकांची प्रशंसा केली. तसेच त्याची किंमत परवडणारी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

कोरोनाच्या साथीच्या काळात देशातील जनतेने दाखविलेल्या संयमाचीही पंतप्रधानांनी विशेष तारिफ केली. कोरोनाची लस आलेली असताना देखील जनता अशाच संयमाचे प्रदर्शन करील, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. एखाद्या रोगावरील लस तयार करण्यासाठी कितीतरी वर्षांचा कालावधी लागतो. पण भारतात अल्पावधितच कोरोनाच्या एक नाही तर दोन लसी विकसित करण्यात आल्या. तसेच तिसर्‍या लसीची चाचणी सुरू आहे, असे सांगून यावर पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला.

ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका संभवतो, त्यांना या लसीसाठी सुरूवातीच्या काळात प्राधान्य दिले जाईल, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. भारतात विकसित झालेल्या लसी सुरक्षित असल्याची ग्वाही देऊन जगभरातील विकसनशील देश भारताकडे या लसींची मागणी करीत आहेत.

leave a reply