अमेरिकेतील कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नाही

- राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सल्लागार अँथनी फॉसी यांचा दावा

वॉशिंग्टन – ‘सर्व परिस्थिती सामान्य होण्यापूर्वीच कोरोना साथीवर विजय मिळविल्याचे जाहीर करता येणार नाही. कोरोनाविरोधातील मोहिमेत अमेरिकेने अर्धा टप्पा पार केला आहे. पण मोहीम संपलेली नाही आणि अमेरिकी जनतेने याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे’, असा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार अँथनी फॉसी यांनी केला. फॉसी यांच्या या दाव्यावर अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, संसद सदस्य जिम जॉर्डन यांनी डॉ. फॉसी यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

अमेरिकेत कोरोनाचे तीन कोटी, २६ लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून बळींची संख्या पाच लाख, ८४ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या काही महिन्यात अमेरिकेने कोरोनाविरोधात आक्रमक लसीकरण मोहीम राबविली आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यात अमेरिकेतील कोरोना रुग्णांची टक्केवारी घसरत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्षीय सल्लागारांनी केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

फॉसी यांनी आपल्या मुलाखतीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लसीकरणाबाबत केलेल्या घोषणेचेही स्वागत केले. ‘लसीकरणाच्या बाबतीत अमेरिका योग्य दिशेने चालली आहे. अंधार्‍या बोगद्याच्या शेवटी प्रकाश दिसू लागला आहे’, असे राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांनी स्पष्ट केले. मात्र सध्या विजयाची दवंडी पिटण्याची वेळ नसून अधिकाधिक जनतेला लस देण्यासाठी हालचाली करयाला हव्यात, असेही डॉक्टर फॉसी म्हणाले.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मंगळवारी लसीकरण मोहिमेसंदर्भात नवी घोषणा केली. या घोषणेनुसार, येत्या ४ जुलैपर्यंत अमेरिकेतील ७० टक्के प्रौढ नागरिकांना कोरोना लसीचा एक डोस मिळावा, असे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. अमेरिकी आरोग्य यंत्रणा ‘सीडीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३० टक्क्यांहून अधिक जनतेचे लसीकरण पूर्ण झाले असून, किमान ४४ टक्के जनतेला एक डोस देण्यात आला आहे. त्याचवेळी अमेरिकेत १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी पुढील आठवड्यात मान्यता दिली जाण्याचेही संकेतही बायडेन प्रशासनातील अधिकार्‍यांनी दिले.

मात्र अमेरिकेतील काही तज्ज्ञांनी लसीकरणानंतरही येत्या हिवाळ्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा फटका बसू शकतो, असे बजावले आहे. अमेरिकेतील ‘वॅक्सिन ऍडव्हायझरी कमिटी’चे सदस्य असलेल्या डॉ. पॉल ऑफिट यांनी हा इशारा दिला. अमेरिकेच्या जनतेचे लसीकरण ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले नाही, तर येत्या हिवाळ्यात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढलेला पहायला मिळेल, अशी चिंता डॉक्टर पॉल यांनी व्यक्त केली. आरोग्यविषयक सल्लागार डॉ. लिएना वेन यांनीही, हिवाळ्यापर्यंत अमेरिकेला ‘हर्ड कम्युनिटी’ गाठणे शक्य होणार नाही व रुग्णांच्या संख्येत मोठ वाढ होईल, असा इशारा दिला आहे. मात्र सध्या अमेरिकेची माध्यमे आपल्या देशातील कोरोनाच्या साथीकडे दुर्लक्ष करून भारतातील कोरोनाच्या फैलावाकडे लक्ष केंद्रीत करीत असल्याचे दिसते आहे.

leave a reply