देशात एका दिवसात कोरोनाव्हायरसमुळे ४६ जण दगावले – रुग्णांची संख्या ८०९ ने वाढली

देशात एका दिवसात  कोरोनाव्हायरसमुळे ४६ जण दगावले  –  रुग्णाच्या संख्या ८०९ ने वाढली
नवी दिल्ली, दि. १० (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनच्या १६ व्या दिवशी देशात कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे ४६ जण दगावले, तर  रुग्णांची संख्या ८०९ ने वाढून ६ हजार ४१२ वर पोहोचली आहे. बळींची संख्या आणि रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारतातील आतापर्यंत हा सर्वात वाईट दिवस ठरला. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढण्याच्या शक्यतेने जोर पकडला आहे. मंगळवारी लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असला तरी त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर पुढील निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. याआधीच काही राज्य सरकारांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे.
भारतात आठवड्याभरात कोरोनाव्हायरसचा फैलाव वेगाने वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या शुक्रवारी ३ एप्रिलपर्यंत देशात या साथीमुळे ५६ जण दगावले होते, तर एकूण रुग्णांची संख्या २३०१ पर्यंत पोहोचली होती. मात्र या सात दिवसात रुग्ण संख्या सुमारे ४५०० ने वाढली आहे व देशभरातील मृतांची संख्या ५६ वरून १९९ पर्यंत पोहोचली आहे. गुरुवारपासून चोवीस तासात तब्बल ४६ जण दगावले, तसेच देशातील या साथीच्या रुग्णांच्या संख्येने ६००० चा टप्पा ओलांडला.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात गुरुवारी संपूर्ण दिवसात २२५ नवे रुग्ण आढळले होते, तर शुक्रवारी सकाळी आणखी २६ रुग्णांची नोंद झाली. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढून १३९० पर्यंत पोहोचली आहे. यातील ६० टक्के रुग्ण मुंबईत सापडले आहेत. धारावी सारख्या दाट लोकवस्तीत या साथीच्या रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली आहे. तसेच शुक्रवारी सकाळी दादर भागात तीन रुग्ण आढळले. यामधील दोन सुश्रुषा रुग्णालयातील नर्स आहेत. लॉकडाऊन असूनही काही ठिकाणी नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवीत आहेत. काही प्रमुख भाजी मंडयांमध्ये गर्दी उसळत आहे. हे पाहता भाजी मंडयां बंद करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. वाशी येथील बाजार शनिवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
तामिळनाडूमध्ये ९६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून या राज्यातही रुग्णांची संख्या ८०० च्या पुढे गेली आहे.तामिळनाडूत आतापर्यंत कोरोनाव्हायरसचे ८३४ जण आढळले आहेत. या राज्यात लोकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या एक लाख ३५ हजार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना अटकही करण्यात आली आहे. तसेच सुमारे १ लाख वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. महाराष्ट्र व तामिळनाडूनंतर सर्वात वाईट स्थिती राजधानी दिल्लीत असून येथील रुग्ण संख्या वाढून ७५० वर पोहोचली आहे. यानंतर राजस्थानात ४८९, मध्य प्रदेश ४४०, उत्तरप्रदेशात ४२९, आंध्रप्रदेश ३६५, गुजरात ३०८ या राज्यात सार्वधिक रुग्ण आढळले आहेत. 
दरम्यान देशभरात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी  राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली. सर्व राज्य सरकारे ही साथ रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. राज्यांना लॉकडाऊनचे काटेकोरपाने पालन करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणाले. शनिवारी पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुखमंत्र्यांबरोबर चर्चा करतील. १४ एप्रिल रोजी २१ दिवसाचा लॉकडाऊन कालावधी संपत आहे. तत्पूर्वी होणाऱ्या या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

leave a reply