भारताचे पंतप्रधान व रशियन राष्ट्राध्यक्षांमध्ये कोरोनाव्हायरसवर चर्चा

भारताचे पंतप्रधान व रशियन राष्ट्राध्यक्षांमध्ये कोरोनाव्हायरसवर चर्चा

बुधवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी फोनवरून संवाद साधला. यावेळी कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे उद्भभवलेल्या संकटावर उभय नेत्यांची फोनवरून चर्चा पार पडली. ‘जी-२०’च्या बैठकीआधी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरते.

भारतामध्ये कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या ६५०च्या पुढे गेली आहे. रशियामध्येही कोरोनाव्हायरसचा प्रसार सुरू झाला आहे. रशियामध्ये एका रात्रीत १६३ नव्या रुग्णांची भर पडली. त्यानंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आठवडाभराची रजा जाहीर केली. पण राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लॉकडाऊन घोषित केलेले नाही. या घडामोडी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात कोरोनाव्हायरसवर चर्चा पार पडली.

भारत आणि रशियाने कोरोनाव्हायरसच्या विरोधात कडक उपाययोजना राबविल्या आहेत. त्या यशस्वी होण्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांना सदिच्छा दिल्या. तसेच रशियामधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशियन यंत्रणानी केलेल्या सहाय्याचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. तर यापुढेही रशिया भारताला सहाय्य करील, असे आश्वासन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावेळी दिले.

दरम्यान, उभय देशांच्या नेत्यांमध्ये आरोग्य, औषधे, वैज्ञानिक संशोधन, मानवतावादी सहाय्याबाबत सहकार्य तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर या साथीचा परिणाम यांवर विचारविनिमय झाला. या क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. तसेच उभय देशांच्या सहकार्यावरही पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात चर्चा पार पडली. याआधी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू व ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.

leave a reply