कोरोनाव्हायरस हे तर हिमनगाचे टोक – चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील संशोधिका शी झेंग्ली

बीजिंग – जगभरात सव्वातीन लाखाहून अधिक जणांचा बळी घेणारे कोरोनाव्हायरस हे तर हिमनगाचे केवळ टोक आहे, असा इशारा चीनच्या वुहान प्रयोगशाळेच्या प्रमुख संशोधिका ‘शी झेंग्ली’ यांनी दिला. भविष्यात येणाऱ्या कोरोनाव्हायरसपेक्षाही भयंकर असणाऱ्या महामारीला रोखायचे असेल, तर या साथीच्या विषाणूंचा अभ्यास करावा लागेल. अन्यथा भविष्यात याहून भीषण साथीचा सामना करावा लागेल’, असे झेंग्ली यांनी बजावले. ‘बॅट वुमन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या झेंग्ली यांनीच कोरोनाच्या विषाणूचा जन्म वुहानच्या प्रयोगशाळेत झाल्याचे मान्य करुन जगभरात खळबळ उडविली होती.

आंतरराष्ट्रीय टीकेचे लक्ष्य ठरलेल्या वुहानमधील प्रयोगशाळेच्या उपप्रमुख आणि कोरोनाव्हायरसच्या विषाणूवर काम करणाऱ्या संशोधिका शी झेंग्ली यांनी चिनी वृत्तवाहिनीशी बोलताना हा इशारा दिला. एखाद्या विषाणूवर होणाऱ्या संशोधनाबाबत सरकार आणि शास्त्रज्ञ यांच्यात पारदर्शकता व सहकार्य असणे आवश्यक आहे, असे मत झेंग्ली यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर, सध्या जगभरात थैमान घालणारा कोरोनाव्हायरस विषाणू म्हणजे केवळ हिमनगाचे टोक असून याहून भयावह विषाणू अस्तित्वात आहेत, अशी थरकाप उडविणारी शक्यता झेंग्ली यांनी वर्तविली. भविष्यात प्राण्यांमधून मानवात संक्रमित होणाऱ्या विषाणूंवर आधीच संशोधन होणे आवश्यक आहे. तरच यापुढील महामारी रोखता येऊ शकते, असे झेंग्ली म्हणाल्या.

कोरोनाव्हायरसपेक्षाही भयानक महामारीबाबत इशारा देत असताना, झेंग्ली यांनी वुहानच्या प्रयोगशाळेचा कोरोनाव्हायरसशी संबंध नसल्याचा अजब दावा केला. आपण ज्या विषाणूवर काम केले त्या आणि कोरोनाच्या विषाणूमध्ये मोठा फरक असल्याचे झेंग्ली यांनी सदर वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. चीन सरकारच्या दडपणामुळे झेंग्ली यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यापासून फारकत घेणारी विधाने केल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामागे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे दडपण असण्याची दाट शक्यता आहे. कारण, २०१५ साली, झेंग्ली यांनीच वुहान प्रयोगशाळेतील संशोधनावर लिहिलेल्या लेखात ‘सार्स सिओव्ही-२’ अर्थात कोरोनाव्हायरसचा स्पष्टपणे उल्लेख केला होता. झेंग्ली यांचा लेख आणि यासंबंधी सरकारी वृत्तवाहिनीने तयार केलेला माहितीपट माध्यमांसमोर काही आठवड्यांपूर्वी उघड झाल्यानंतर चीनचे सरकार अडचणीत आले होते.

म्हणूनच आता झेंग्ली यांच्याकडून, आपण काम करीत असलेला विषाणू आणि कोरोनाव्हायरस यांच्यात संबंध नसल्याचे चीनच्या राजवटीने वदविले आहे. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय समुदाय झेंग्ली यांच्याकडून आधी प्रसिद्ध झालेली माहितीच ग्राह्य मानेल, असे दिसत आहे. कारण, झेंग्ली यांनी २०१५ साली दिलेली माहिती कूठल्याही दडपणाशिवाय दिली होती. तर आता झेंग्ली करीत असलेली विधाने चिनी राजवटीच्या दबावाखाली करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply