लसींना न जुमानणारे कोरोनाचे नवे ‘व्हेरिअंट्स’ विकसित होत आहेत

- लस विकसित करणार्‍या संशोधकांचा इशारा

वॉशिंग्टन – कोरोनाचा विषाणू जसा अधिकाधिक पसरतो आहे, तसे त्यात वेगाने बदल होऊन नवे प्रकार (व्हेरिअंट्स) विकसित होत आहेत. सध्या देण्यात येणारी लस त्यातील काही प्रकारांविरोधात फारशी प्रभावी ठरलेली नाही, असा इशारा लस विकसित करणार्‍या संशोधकांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यात ब्रिटन, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका व भारतात कोरोनाचे नवे व घातक प्रकार समोर आले असून त्याने साथीचा फैलाव पुन्हा वाढत असल्याचे उघड झाले होते. या पार्श्‍वभूमीवर लस विकसित करणार्‍या संशोधकांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

लसींना न जुमानणारे कोरोनाचे नवे ‘व्हेरिअंट्स’ विकसित होत आहेत - लस विकसित करणार्‍या संशोधकांचा इशाराकाही दिवसांपूर्वी कोरोनावर लस विकसित करणारी अमेरिकेची आघाडीची कंपनी ‘मॉडर्ना’ची व्हर्च्युअल बैठक पार पडली. बैठकीत कोरोनाचे नवे प्रकार व उपाययोजना यावर चर्चा झाल्याची माहिती अमेरिकी वेबसाईटने दिली आहे. याच बैठकीत मॉडर्नाच्या संशोधकांनी नव्या ‘व्हेरिअंट्स’बाबत इशारा दिला.

‘कोरोनाचा विषाणू जसाजसा फैलावतो आहे, तसे त्यात अतिशय वेगाने बदल होत आहेत. विषाणूचे काही प्रकार मूळ विषाणूपेक्षाही अधिक वेगाने व सहजतेने संसर्ग पसरवित आहेत. यातील काही विषाणू सध्या देण्यात येणार्‍या लसीला दाद देत नसल्याचेही समोर आले आहे’, या शब्दात मॉडर्नाच्या मुख्य संशोधन अधिकारी मेलिसा मूर यांनी इशारा दिला. तर, नवे अधिक घातक विषाणूंचे प्रकार येत आहेत आणि ते ‘रिअल टाईम’मध्ये विकसित होऊन उघड होत आहेत, असे गुलामे स्टेवट-जोन्स या संशोधकाने बजावले आहे.लसींना न जुमानणारे कोरोनाचे नवे ‘व्हेरिअंट्स’ विकसित होत आहेत - लस विकसित करणार्‍या संशोधकांचा इशारा

मॉडर्नाचे संशोधक विषाणूच्या नव्या प्रकारांबाबत इशारे देत असतानाच आग्नेय आशियातील व्हिएतनाममध्ये एक नवा ‘स्ट्रेन’ समोर आला आहे. ब्रिटन व भारत या दोन देशांमध्ये आढळणारे कोरोना विषाणूंचे प्रकार एकत्र होऊन नवा ‘हायब्रिड व्हेरिअंट’ तयार झाल्याची माहिती व्हिएतनामच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. हा नवा प्रकार अधिक वेगाने व सहजतेने पसरत असल्याचे संशोधनातून उघड झाल्याचे आरोग्यमंत्री एन्गुयेन थान लाँग यांनी सांगितले. व्हिएतनामच्या 30 शहरे व प्रांतांमध्ये कोरोनाव्हायरसचा हा नवा प्रकार आढळला असून वाढत्या फैलावामागे हाच कारणीभूत असल्याचा संशय आहे, असा दावाही त्यांनी केला.लसींना न जुमानणारे कोरोनाचे नवे ‘व्हेरिअंट्स’ विकसित होत आहेत - लस विकसित करणार्‍या संशोधकांचा इशारा

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) युरोपातील प्रमुख अधिकारी डॉक्टर हॅन्स क्लुग यांनी कोरोना साथीबाबत नवा इशारा दिला आहे. जगभरातील किमान 70 टक्के लोकांचे लसीकरण झाल्याशिवाय साथीचा धोका संपल्याचे म्हणता येणार नाही, असे डॉक्टर क्लुग यांनी बजावले. जागतिक लोकसंख्या 7.9 अब्ज इतकी असून, ‘डब्ल्यूएचओ’ने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 26 मेपर्यंत जगभरात 154 कोटी, 63 लाखांहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत.

leave a reply