कोरोनाव्हायरसचा हाहाकार

जगभरात दीड लाख तर अमेरिकेत एका दिवसात ४५९१ बळी

वॉशिंग्टन,  (वृत्तसंस्‍था) – जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकेत या साथीचे सर्वाधिक बळी गेले असून गेल्या चोवीस तासात या साथीने अमेरिकेतील ४५९१ जणांचा बळी घेतला आहे. अमेरिकेतील बळींची संख्या वाढत असताना या देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये लॉकडाउनच्या विरोधात निदर्शने झाली आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाउन मागे घ्यावा, म्हणून दबाव वाढविण्यासाठी ही निदर्शने आयोजित केल्याचा दावा केला जातो.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात १,५०,५९७ जणांचा बळी गेला असून २२,२६,९४१ जणांना याची लागण झाली आहे. यातील ५६ हजारांहून अधिक रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे या साथीची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने म्हटले आहे. तर साडेपाच लाखांहून अधिक जण या साथीतून बाहेर पडले आहेत. या साथीची सर्वाधिक हानी अमेरिकेला सोसावी लागली असून आत्तापर्यंत अमेरिकेत या साथीने ३५ हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये या साथीचे सर्वाधिक १४ हजार बळी गेले आहेत. न्यूयॉर्कमधील परिस्थिती अधिक बिकट असून या ठिकाणी मृत्यूचा वणवा पेटल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. न्यूजर्सी शहरात एका इसमाने या साथीने दगावलेल्या रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी फोन केला होता. पण इमर्जन्सी सर्व्हिसचे कर्मचारी पोहोचले तेव्हा त्यांना कोरोनाव्हायरसने दगावलेल्या १७ जणांचे मृतदेह उचलावे लागले, अशी धक्कादायक बातमी समोर येत आहे.

गेल्या चोवीस तासात या साथीने ब्रिटनमध्ये ८४७ जणांचा बळी घेतला असून  ब्रिटनमध्ये या साथीमुळे १४,५७६ जण दगावले आहेत. युरोपमधील इतर देशांमध्ये परिस्थिती सुधारत असताना ब्रिटनमधील या साथीचा वाढता फैलाव इतर युरोपिय देशांच्या प्रयत्नांवर पाणी फेरू शकते, अशी टीका जागतिक आरोग्य संघटनेने केली. फ्रान्समधील परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. गेल्या चोवीस तासात फ्रान्समध्ये या साथीने ७५३ जण दगावले असून १८ हजारावर एकूण बळी गेले आहेत. तर फ्रान्सच्या ‘चार्ल्स दी गॉल’ या विमानवाहू युद्धनौकेवरील १०८१ जवानांना या साथीची लागण झाल्याचे समोर आले आहे.

leave a reply