चीनच्या वुहान प्रयोगशाळेतच कोरोनाव्हायरसची निर्मिती

- नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा आरोप

लंडन/वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसची निर्मिती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच झाली, असा निष्कर्ष पारितोषिक विजेते संशोधक ‘लुक मौंटेनीर’ यांनी नोंदविला आहे. कोरोनाव्हायरस म्हणजे चीनने विकसित केलेले जैविक शस्त्र असल्याचा आरोप नोबेल पारितोषिक विजेता या संशोधकाच्या निष्कर्षामुळे अधिकच तीव्र होऊ शकतो. जगभरात कोरोनाव्हायरस पसरविण्यामागे चीनचे कारस्थान असल्याचे उघड झाल्यास, या देशाला त्याचे भयंकर परिणाम सहन करावे लागतील, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोनच दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे मौंटेनीर यांनी कोरोनाव्हायरस बाबत नोंदविलेल्या निष्कर्षाचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

जगभरात सुमारे पावणेदोन लाख जणांचा बळी घेणाऱ्या कोरोनाव्हायरसची उत्पत्ती वुहानच्या प्रयोगशाळेत झाली, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठासून सांगत आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या चीनवरील या आरोपांना ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान आणि तैवान या देशांचे समर्थन मिळाले होते. आता नोबेल विजेते ‘लुक मौंटेनीर’ यांनी देखील कोरोनाव्हायरसची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेत झाली, असे स्पष्ट केले आहे. साधारण वीस वर्षांपूर्वीपासून वुहानच्या प्रयोगशाळेत कोरोनाव्हायरसवर संशोधन सुरू केले होते व या संशोधनात चीनने चांगलीच पकड मिळविली अशी माहिती मौंटेनीर यांनी फ्रेंच वृत्तवाहिनीकडे बोलताना दिली.

मौंटेनीर यांच्या आरोपांवर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. चीनसमर्थक वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत जागतिक आरोग्य संघटना पुन्हा एकदा चीनच्या बचावासाठी धावली आहे. पण कोरोनाव्हायरसचे सत्य लपवण्यासाठी चीनने आपल्याच नागरिकांवर केलेल्या कारवाईची माहितीही नेमक्या याचवेळी बाहेर येऊ लागली आहे. कोरोनाव्हायरसचे सत्य जगासमोर मांडणारे पाच चिनी नागरिक गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. यामध्ये डॉक्टर ली वेन्लियांग, रेन झिकियान्ग, चेन कियुशी, फेंग बिन आणि ली जेहुआ यांचा समावेश आहे. यापैकी डॉक्टर ली वेन्लियांग यांचा कोरोनाव्हायरसने मृत्यू झाल्याचे चीनाकडून सांगण्यात येते. याव्यतिरिक्त या साथीबद्दल सोशल मीडियामध्ये माहिती प्रसिद्ध करणारे पाच हजाराहून अधिक जणांना चिनी सुरक्षा यंत्रणेने अटक केल्याची माहिती ब्रिटनच्या माध्यमांनी दिली.

‘जागतिक आरोग्य संघटने’वरील (डब्ल्यूएचओ) आपल्या प्रभावाचा वापर करुन चीनने सहा आठवड्यांपर्यंत ही साथ जगापासून लपविली, असा आरोप व्हाईट हाऊसचे सहाय्यक ‘पीटर नव्यारो’ यांनी केला आहे. या सहा आठवड्यांच्या काळात वुहानमधील साथीवर नियंत्रण मिळविता आले असते. पण या काळात ५० लाख चिनी नागरिक वुहानमधून निघून त्यांनी जगभरात प्रवास केला, असा ठपका नव्यारो यांनी ठेवला. त्याचबरोबर या साथीचा वापर करुन चीनने वैद्यकीय साहित्याचा धंदा मांडला, अशी जळजळीत टीकाही नव्यारो म्हणाले.

कोरोनाव्हायरसची साथ जगभरात थैमान घालत असताना चीनच्या विरोधातील वातावरण अधिकाधिक तीव्र बनत चालले असून चीनवरील आरोपांचा गांभीर्यही वाढत चालले आहे. राजकीय नेत्यांबरोबर आता संशोधकदेखील कोरोनाव्हायरस मानवनिर्मित असून चीनच्या वुहान प्रयोगशाळेतच त्याची निर्मिती झाली, असा निष्कर्ष नोंदवू लागले आहेत. याला उत्तर देणे चीनसाठी अत्यंत अवघड जाईल. सध्या चीन या आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असून आपणही यासाथीचे बळी ठरलो आहोत, असा बचाव चीनकडून केला जात आहे. पण चीनचे यासंदर्भातील दावे स्वीकारण्यास विकसित देश तयार नाहीत.

leave a reply