कोरोनामुळे जपानची अर्थव्यवस्था मंदावली

टोकियो – जगभरात फैलावलेल्या कोरोनाव्हायरस साथीमुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला मंदीचा जबरदस्त फटका बसला आहे. जगातील तीन आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये मंदीचा फटका बसणारा जपान हा पहिलाच देश आहे. कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जवळपास नऊ ट्रिलियन (९ लाख कोटी) डॉलर्सचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

२०२० सालच्या पहिल्या तिमाहीत जपानची अर्थव्यवस्था ३.४ टक्क्यांनी घसरली आहे. त्यापूर्वी २०१९च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या अखेरच्या तिमाहीत जपानी अर्थव्यवस्था ६.४ टक्क्यांनी खाली आली होती. सलग दोन तिमाहिंमध्ये आर्थिक घसरणीचे सत्र कायम राहिल्याने जपानला मंदीचा फटका बसला आहे.

जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्थेला बसलेल्या या मंदीच्या धक्क्यामागे कोरोनाची साथ हाच मुख्य घटक ठरला आहे. जपानची अर्थव्यवस्था प्रामुख्याने निर्यात व पर्यटनावर अवलंबून आहे. चीनमधून सुरू झालेल्या साथीनंतर निर्यात पूर्णपणे थंडावली आहे. विमानप्रवास तसेच जलवाहतूकही बंद झाली असून पर्यटन क्षेत्र ठप्प झाले आहे.

जपान सरकारने कोरोनच्या संकटाला तोंड देण्यासाठी १.१ ट्रिलियन डॉलर्सचे अर्थसहाय्यदेखील घोषित केले आहे. मात्र त्याचे परिणाम दिसून येण्यास बराच काळ लागेल, असे अर्थतज्ज्ञ तसेच विश्लेषकांचे मत आहे. काही आर्थिक गटांनी पुढच्या तिमाहीत जपानला बसणारा फटका प्रचंड मोठा असेल, असा दावा केला आहे. एका वृत्तसंस्थेने, जपानची पुढच्या तिमाहीतील घसरण तब्बल २२ टक्क्यांपर्यंत असेल, असे भाकित वर्तविले आहे.

कोरोनाच्या साथीचा फटका जगातील सर्वच प्रमुख देशांना बसण्यास सुरुवात झाली आहे. २०२०च्या पहिल्या तिमाहीत अमेरिकन अर्थव्यवस्थेला ३.४ टक्क्यांची घसरण पहावी लागली आहे. दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व कोरोना साथीचे उगमस्थान असणाऱ्या चीनलाही पहिल्या तिमाहीत जवळपास सात टक्क्यांचा फटका बसल्याचे सांगण्यात येते. युरोपातील आघाडीची अर्थव्यवस्था असणारा जर्मनीही मंदीच्या विळख्यात असून येत्या काही दिवसात ब्रिटन, फ्रान्स, इटली व स्पेनही आर्थिक मंदी जाहीर करतील, असे मानले जाते.

leave a reply