जगभरात कोरोनाव्हायरसचे एक लाख बळी

वॉशिंग्टन/लंडन, (वृत्तसंस्था ) – जगभरातील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात या साथीने ६५०० हून अधिक जणांचा बळी घेतला असून अमेरिकेत या साथीने दगावणार्‍यांची संख्या भयावहरित्या वाढत आहे. पुढच्या काही तासात या साथीच्या सर्वाधिक बळीची नोंद अमेरिकेत होईल, असा दावा अमेरिकी माध्यमे करू लागली आहेत.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात १,००,३७९ जणांचा बळी गेला असून १६,५२,९४४ जणांना या साथीची लागण झालेली आहे. अमेरिकेत पुन्हा एका दिवसात सर्वाधिक बळी गेले. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत या साथीचे १७८३ बळी गेले. यापैकी ७९९ जण बळी एकट्या न्यूयॉर्क प्रांतात गेले. याबरोबर अमेरिकेतील एकूण बळींची संख्या १७,९२७ वर गेली आहे. तर या देशात साथीचे ४,७८,३६६ रुग्ण आहेत.

न्यूयॉर्क प्रांताच्या गव्हर्नरांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त करुन कोरोनाव्हायरसची साथ अमेरिकेवरील ९/११च्या दहशतवादी हल्ल्यापेक्षाही अधिक भयंकर ठरल्याचे म्हटले आहे. ९/११च्या दहशतवादी हल्ल्यात २७०० हून अधिक जणांचा बळी गेला होता. पण कोरोनाव्हायरसच्या साथीने न्यूयॉर्कमधील आठ हजारांहून अधिक जणांचा बळी घेतल्याचे त्यांनी सांगितले. एकट्या न्यूयॉर्कमधील रुग्णांची संख्या इटली आणि स्पेनमधील रुग्णांच्या संख्येहून अधिक आहे.

गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये या साथीने ९८० जण दगावले असून या देशात एकूण ८,९५८ जणांचा बळी गेला आहे. तर ब्रिटनमध्ये सत्तर हजारांहून अधिक रुग्ण आहेत. गेल्या चार दिवसात ब्रिटनमधील बळींच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, या साथीची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन दोन दिवसांच्या उपचारानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडले आहेत.

leave a reply