कोरोनाकाळातही देशाच्या निर्यातीत 67.39 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली – देशात कोरोनामुळे बहुतांश राज्यांमध्ये निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत अर्थचक्रावर परिणाम झाला असून लहान-मोठ्या उद्योगांसमोर प्रचंड अडचणी आहेत. असे असतानाही मे महिन्यात देशाच्या निर्यातीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या मे महिन्यात निर्यातीमध्ये 67.39 टक्के इतकी वाढ नोंदविण्यात आली आहे. मे महिन्यात एकूण 32.21 अब्ज डॉलर्सची निर्यात झाल्याची माहिती वाणिज्य विभागातर्फे देण्यात आली.

कोरोनाकाळातही देशाच्या निर्यातीत 67.39 टक्क्यांची वाढगेल्यावर्षीपासून कोरोनासाथीमुळे केवळ भारतीयच नाही संपूर्ण जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम जाणवत आहे. सर्वच देशांची जीडीपी दर घसरले आहेत. मार्चमध्ये संपलेल्या 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी उणे 7 टक्के राहिला होता. मात्र मार्च महिन्याचा जीडीपीत सुमारे दीड टक्क्यांची वाढ झाली होती. तीन दिवसांपूर्वी याची माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. तसेच एप्रिल महिन्यातील उत्पादनाची आकडेवारीही वाणिज्य मंत्रालयाने घोषित केली होती. यानुसार एप्रिल महिन्यात आठ प्रमुख क्षेत्रातील उत्पादनात 56.1 टक्के वाढ झाली होती. आता वाणिज्य मंत्रालयाने मे महिन्याचे आयात व निर्यातीची प्राथमिक आकडेवारी जारी केली आहे. यावरून कोरोनाचे संकट असले तरी भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करताना दिसत आहे. निर्यातीवर कोरोनाच्या संकटाचा विशेष परिणाम जाणावलेला नाही, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

मे महिन्यात एकूण 32.21 अब्ज डॉलर्स इतकी निर्यात भारतातून झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात अर्थात 2020-21 च्या मे महिन्यात हीच निर्यात 19.24 अब्ज डॉलर्स इतकी होती. तर 2019 सालच्या मे महिन्यात 29.85 अब्ज डॉलर्सची निर्यात नोंदविण्यात आली होती.

चालू आथिर्र्क वर्षाच्या पहिल्या दोन महिन्याचा अर्थात एप्रिल-मे या दोन्ही महिन्याचा विचार केल्यास भारतातून एकूण 62.84 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे. तेच गेल्यावर्षी या दोन महिन्यात केवळ 29.6 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती. तेच 2019 साली एप्रिल-मे महिन्यात एकूण 55.88 अब्ज डॉलर्सची निर्यात झाल्याची नोंेद करण्यात आली होती.

निर्यातीबरोबर आयातीमध्येही 68.54 टक्क्यांची वाढ मे महिन्यात झाली आहे. मे महिन्यात 38.53 अब्ज डॉलर्स इतकी आयात भारतात झाली असून यानुसार व्यापारी तूट 6.32 इतकी झाली आहे.

leave a reply