राजस्थानमध्ये पाकिस्तान सीमेनजीक राष्ट्रीय महामार्गावर लढाऊ विमानांसाठी देशातील पहिली ‘इमर्जन्सी लॅण्डिंग’ धावपट्टी

  • सी-१३०जे, सुखोई-३०एमकेआय, एएन-३२ विमान आणि एमआय-१७ हेलिकॉप्टर उतरून पाकिस्तानला संदेश
  • राष्ट्रीय महामार्गावर लढाऊ विमानांसाठी पहिली ‘इमर्जन्सी लॅण्डिंग’ सुविधा
  • देशभरात १९ ठिकाणी महामर्गांवर ‘इमर्जन्सी लॅण्डिंग’ सुविधा विकसित करणार
  • १५ दिवसात धावपट्ट्या उभारून देण्याची केंद्रीय महामार्ग व वाहतूकमंत्र्यांची वायुसेनेला ग्वाही

बारमेर – बुधवारी सकाळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय महामार्गमंत्री नितिन गडकरी याच्यासह संरक्षणदल प्रमुख जनरल बिपीन रावत, वायुसेनाप्रमुख आर.के.एस भदौरिया असलेल्या सी-१३०जे या वायुसेनेच्या अवजड वाहतूक विमानाने राष्ट्रीय महामार्ग-९२५ वर लॅण्डींग केले. याद्वारे वायुसेनेच्या विमानांसाठी उभारण्यात आलेल्या देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामर्गावरील पहिल्या ‘इमर्जन्सी लॅण्डिंग फॅसिलिटी’चे (ईएलएफ) औपचारीक उद्घाटन झाले. राजस्थानमधील पाकिस्तानबरोबरील सीमेपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या या राष्ट्रीय महार्गावर सी-१३०जे पाठोपाठ सुखोई-३०एमकेआय, एएन-३२ विमान आणि एमआय-१७ हेलिकॉप्टरचे लॅण्डींग करून भारताने पाकिस्तानला संदेश दिल्याचे म्हटले जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही आंतरराष्ट्रीय सीमेजवळील या धावपट्टीने देशाची एकता आणि सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचा संदेश गेल्याचे यावेळी अधोरेखित केले.

राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात ‘सट्टा-गंधव’ येथे एनएच-९२५ महामार्गावर वायुसेनेच्या विमानांसाठी ही ‘ईएलएफ’ सुविधा उभारण्यात आली आहे. इतर विकसित देशात महामार्गांवर लढाऊ विमानांसाठी अशा आपत्कालीन धावपट्ट्या उभारल्या जातात. भारतात मात्र पहिल्यांदाच राष्ट्रीय महामर्गावर अशा प्रकारची धावपट्टी उभी राहीली आहे. २०१७ साली लखनौ-आग्रा महामार्गावर अशा आपत्कालीन धावपट्टी उभारण्यात आली होती व तेथे वायुसेनेच्या विमानाची लॅण्डींगही झाली. मात्र लखनौ-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग नसून तो सीमेपासूनही दूर आहे. त्यामुळे बारमेरमधील ‘सट्टा-गंधव’ येथील एनएच-९२५वरील धावपट्टी राष्ट्रीय महामार्गावरील पहिली धावपट्टी ठरली आहे. तसेच ती पाकिस्तानबरोबरील आंतराष्ट्रीय सीमेपासून काही अंतरावर असल्याने तिचे समारिक महत्त्व खूप अधिक आहे. युद्धकाळात व इतर आपातस्थितीत भारतीय वायुसेना या महामार्गावरील ‘ईएलएफ’ सुविधेचा वापर करू शकते. यामुळे या भागातून मोहिम राबविण्याची वायुसेनेची क्षमताही वाढली आहे.

बारमेरमध्ये एनएच-९२५वर ‘सट्टा-गंधव’ येथे तीन किलोमटरमध्ये ही आपत्कालीन लॅण्डींग सुविधा उभारण्यात आली असून २०१९च्या जुलै महिन्यात महामार्गावरील या धावपट्टीचे काम सुरू झाले होते. ही धावपट्टी पुर्ण होण्यास १९ महिन्यांचा कालावधी लागला. मात्र या पुढील धावपट्ट्या जलदगतीने उभारू असे आश्‍वासन केंद्रीय महामार्ग व वाहतूक मंत्र्यांनी वायुसेनाप्रमुखांना दिले आहे. दीड वर्षाच्या जागी १५ महिन्यांत चांगल्या दर्ज्याच्या धावपट्ट्या उभारून देऊ अशी ग्वाही आपण वायुसेनाप्रमुखांना दिल्याचे यावेळी गडकरी म्हणाले. तसेच आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक क्षण असून भारत आपल्या क्षमतांचा विस्तार करीत असल्याचे गडकरी यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय महामार्गांवर धावपट्ट्या विकसित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि वायुसनेने बारमेर व्यतिरिक्त २७ महामार्गांची निवड केली आहे, ज्यावर आपत्कालीन लॅण्डींग सुविधा उभारता येईल. याबाबतचा अभ्यास सध्या सुरू आहे, असे केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले. यातील किमान १९ महामार्गांवर पुढील काळात अशा धावपट्ट्या उभ्या राहतील. यामध्ये राजस्थानमधील फलोदी – जैसलमेर, आणि बाडमेर – जैसलमेर या महामर्गांचा समावेश आहे. तसेच पश्चिम बंगालमधील खरगपूर-बालासोर, खरगपूर-केंझार आणि पनागढ/केकेडी जवळ अशी लॅण्डींग सुविधा उभी राहिल.

तामिळनाडूमध्ये पुदुचेरी महामार्गावर चेन्नई येथे, आंध्र प्रदेशात नेल्लोर-ओंगोले महामर्गा आणि ओंगोले -चिलाकलुरिपेट महामार्ग, हरियाणातील मंडी डबवाली ते ओढन महामार्ग, पंजाबमधील संगरूरजवळ, गुजरातमधील भुज-नलिया आणि सुरत-बडोदा महामार्गावर, जम्मू-काश्मीरमध्ये बनिहाल-श्रीनगर महामार्गांवर, लेह-न्योमा क्षेत्र आणि आसाममधील जोरहाट-बाराघाट महामार्गावर, शिवसागर जवळ तसेच बागडोगरा-हाशिमारा, हाशिमारा-तेजपूर आणि हाशिमारा-गुवाहाटी महमार्गावर अशी आपत्कालीन लॅण्डींग सुविधा उभारण्यात येणार आहे.

दरम्यान, बारमेरमध्ये एनएच-९२५ वर उभारण्यात आलेल्या ‘इमर्जन्सी लॅण्डिंग फॅसिलिटी’ व्यतिरिक्त जयपूरजवळ कुंदनपूरा, भरतपूर जिल्ह्यातील सिंघानिया आणि बारमेरमधील बाखासर येथे वायुसेना व लष्करासाठी हेलिपॅड विकसित करण्यात येत आहेत. यामुळे राजस्थानमधील पाकिस्तानबरोबरील पश्‍चिमी सीमेवर संरक्षण सज्जता अधिकच मजबूत होणार आहे.

leave a reply