पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी विक्रमी 20 टक्क्यांवर

जीडीपीनवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव बाजूला सारून भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी भरारी घेतली असून पहिल्या तिमाहीत सकल उत्पादन दर (जीडीपी) 20.1 टक्के इतका विक्रमी राहिल्याचे समोर आले आहे. मंगळवारी केंद्र सरकारकडून चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे आकडे जाहीर करण्यात आले. यामुळे उद्योग जगतात व गुंतवणूकदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. अर्थतज्ज्ञांनीही यावर समाधान व्यक्त केले आहे. तरीही अपेक्षेच्या तुलनेत जीडीपी अर्थव्यवस्थेची कामगिरी किंचित कमी राहिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरबीआयने पहिल्या तिमाहीत जीडीपी 21.4 टक्के राहिल असा अंदाज व्यक्त केला होता.

कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. मात्र जुलै महिन्यापासून आर्थिक उलाढाली सामान्य होण्यास सुरुवात झाली. त्याआधी एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत दुसऱ्या लाटेने शिखर गाठले होते व बहुतांश राज्यांनी विविध प्रकारचे संचार निर्बंध लादले होते. असे असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेची पहिल्या तीन महिन्यातील कामगिरी दैदिप्यमान झाली आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून हळूहळू आर्थिक उलाढाली सामान्य होऊ लागल्या.

जानेवारी ते मार्च या गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 1.6 टक्के इतक्या सकारात्मक पातळीवर पोहोचला होता. याआधीच्या तीन तिमाहीतील आकडे हे नकारात्मक होते व विकासदराची टक्केवारी उणे दर्शविण्यात आली होती. गेल्यावर्षीच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी हा उणे 24.4 टक्के इतका होता. पुढील काळात ही आकडेवारी सुधारत गेली व शेवटच्या तिमाहीत जीडीपी 1.6 टक्क्यांवर पोहोचला. तरी एकूण वर्षाचा जीडीपी हा उणे 7.3 टक्के इतका राहिला होता.

मात्र यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत परिस्थिती नेमकी उलटी आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट मोठी असतानाही आर्थिक उलाढाली पूर्णपणे ठप्प होणार नाहीत, अश रितीने घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, तसेच संपूर्ण देशात सरसकट निर्बंध न लादल्याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उणे 24.4 टक्के असलेला जीडीपी यावर्षी 20.1 टक्के नोंदविण्यात आला आहे. गेल्यावर्षी आर्थिक विकासाला लागलेला ब्रेकची यावर्षी भरपाई होताना दिसत आहे.

सर्वच क्षेत्रांचा विकासदर वाढला आहे. बांधकाम, उत्पादन, खाणकाम, हॉटेल, वाहतूक, दूससंचार, ऊर्जा क्षेत्राची कामगिरी गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीपासून अर्थात जानेवारी ते मार्चपासून सुधारली होती. ही गती कायम असून प्रमुख क्षेत्रांनी दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या तिमाहीत कर संकलनही वाढून 5.21 लाख कोटी झाले आहे. मात्र कोरोनाच्या प्रभावामुळे सरकारने खर्च वाढविला असून सरकारने 10.4 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. यामुळे आर्थिक तूट वाढली आहे. पुढील काळात आर्थिक विकास आणखी वेगाने होईल. लसीकरणाने वेग पकडल्यावर आर्थिक उलाढालीमध्ये आणखी तेजी येईल, असा विश्‍वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

leave a reply