लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता – एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांची माहिती

नवी दिल्ली – देेशात लहान मुलांसाठी कोरोनावरील लस सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती परिणाम होईल याबाबत निरनिराळी मते समोर येत आहेत. त्याचवेळी अमेरिकेसह काही युरोपिय देशांमध्ये 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतात लहान मुलांसाठी लस कधी उपलब्ध होईल, याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना डॉ. गुलेरिया यांनी हा अंदाज व्यक्त केला.

डॉ. गुलेरियासध्या देशात लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. लसीकरणाचे नवे धोरण लागू झाल्यानंतर दोनच दिवसात देशात 1 कोटी 40 लाख नागरिकांचे लसीकरण झाले. बुधवारीही 58 लाख जणांचे लसीकरण झाले. 30 जूनपर्यंत दिवसाला 50 लाखांहून अधिक लसींचे डोस देण्याचे लक्ष्य सरकारने बाळगले आहे. तसेच जुलै महिन्यात लसी अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यावर दिवसाला एक कोटी लसीकरणाचे लक्ष्य सरकारने ठेवल्याची बातमी अधिकार्‍यांच्या हवाल्याने येत आहे.

डॉ. गुलेरियाकोरोनाच्या तिसर्‍या लाटेला थोपविण्यासाठी किंवा तीचा परिणाम कमी करण्यासाठी जास्तीत जास्त जणांचे लसीकरण हाच मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामध्ये तिसर्‍या लाटेत लहान मुलांमध्ये संक्रमण पहिल्या दोन लाटांपेक्षा अधिक होईल, अशी भिती सातत्याने काही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. यामुळे भारतात 18 वर्षांखालील मुलांना लसीचे सुरक्षाकवच कधी मिळेल, याबाबत प्रश्‍न विचारण्यात येत आहेत.

याबाबत एम्सच्या संचालक डॉ. गुलेरिया यांनी खुलासा केला आहे. भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसींच्या लहान मुलांवरील चाचण्या सध्या सुरू आहेत. लहान मुलांवर सुरू असलेल्या या क्लिनिकल ट्रायलच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील अहवाल सप्टेंबरपर्यंत मिळतील आणि लगेचच या लसीला लहान मुलांसाठी मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती डॉ. गुलेरिया यांनी दिली.

 12 मे रोजी ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) लहान मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या घेण्यास मंजुरी दिली होती व जूनच्या पहिल्या आठवड्यात या चाचण्या सुरू झाल्या होत्या. याशिवाय फायजर-बायोएनटेकच्या लसीलाही मंजुरी मिळू शकते. तसे झाल्यास लहान मुलांच्या लसीकरणासाठी आणखी एक लस उपलब्ध होईल, अशी माहिती टास्क फोर्सच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

leave a reply