अफगाणिस्तानातील संकटामुळे पाकिस्तान अनिश्‍चिततेच्या गर्तेत जाईल

- कॅनडास्थित अभ्यासगटाचा इशारा

टोरंटो – १५ ऑगस्ट रोजी तालिबानने राजधानी काबुलचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानचे आजी-माजी लष्करी अधिकारी, कट्टरपंथी नेते व माध्यमांनी त्याचा जल्लोष केला. हा भारतावरचा विजय असल्याचा दावा पाकिस्तानी विश्‍लेषकांनी केला होता. पण तालिबान आणि इतर दहशतवादी संघटना जसजशा अफगाणिस्तानवरील आपली पकड घट्ट करू लागली आहेत, त्याच प्रमाणात पाकिस्तानसमोरील आव्हाने वाढू लागली आहेत. अफगाणिस्तानातील संकट गहिरे होत असताना, पाकिस्तान आपणच तयार केलेल्या या फासात अडकला आहे, असा इशारा कॅनडास्थित अभ्यासगटाने दिला.

गेल्या आठवड्यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे प्रमुख फैझ हमीद यांनी अफगाणिस्तानचा दौरा केला होता. पाकिस्तानी माध्यमांनी हमीद यांच्या या दौर्‍याचे समर्थन करताना, पाकिस्तान तालिबानला देश उभारून देण्यात सहाय्य करीत असल्याचे दावे केले होते. पण पाकिस्तान तारणहार म्हणून नाही तर अफगाणिस्तानातील भयानक संकटांचा प्रायोजक म्हणून काम करीत असल्याचा गंभीर आरोप ‘इंटरनॅशनल फोरम फॉर राईट्स अँड सिक्युरिटी-आयएफएफआरएएस’ या अभ्यासगटाने केला.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घ्यावी, या योजनेचा मुख्य पुरस्कर्ता पाकिस्तानच होता. त्यामुळे अमेरिकेच्या या सैन्यमाघारीसाठी पाकिस्तान देखील तितकाच जबाबदार असल्याची खरमरीत टीका ‘आयएफएफआरएएस’ने केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेच्या या माघारीचे स्वागत केले. तसेच तालिबानने गुलामीच्या बेड्या तोडल्याची घोषणा केली होती. पाकिस्तानी माध्यमांनी देखील हा भारतावरील विजय असल्याचे दावे सुरू केले होते. पण अफगाणिस्तानात तालिबानची राजवट प्रस्थापित होणे, हे पाकिस्तानच्या हिताचे नाही, याची जाणीव पाकिस्तानातील काही विश्‍लेषकांना आता होऊ लागली आहे, याकडे या अभ्यासगटाने लक्ष वेधले.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले धोरणात्मक महत्त्व असल्याचे दावे करणारा पाकिस्तान हा अमेरिका किंवा चीनसाठी ‘क्लायंट’ म्हणून काम करीत असल्याचा ठपका या अभ्यासगटाने ठेवला. या दोन्ही देशांची मर्जी सांभाळणे पाकिस्तानसाठी अधिकाधिक अवघड बनत चालल्याचे कॅनेडियन अभ्यासगटाने लक्षात आणून दिले. काही वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिका आणि पाकिस्तानातील संबंध चांगले होते. पण पाकिस्तानने चीबरोबरच्या सहकार्याला महत्त्व देऊन ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर-सीपीईसी’ला प्राधान्य दिल्यानंतर पाकिस्तानसमोरील समस्या अधिकच जटिल बनल्याचा दावा ‘आयएफएफआरएएस’ने केला.

तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यापासून पाकिस्तानात तीन मोठे दहशतवादी हल्ले झाले असून यामध्ये दोन आत्मघाती हल्ल्यांचा समावेश आहे. याशिवाय अफगाण-पाकिस्तान सीमेवर तालिबानचे दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्करामध्ये संघर्ष सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तालिबानने अफगाणिस्तान व पाकिस्तानची विभागणी करणारी ‘ड्युरंड लाईन’ आपल्याला मान्य नसल्याचे जाहीर केले आहे. ही कृत्रिम सीमा न मानता पाकिस्तानने अफगाणींना आपल्या देशात मुक्तपणे प्रवेश द्यावा, असे तालिबानचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलचा ताबा घेतल्यानंतर, त्याचा जल्लोष करणार्‍या तालिबानच्या दहशतवाद्यांनी सीमेवर तैनात असलेल्या पाकिस्तानच्या जवानांना यानंतर तुमचा नंबर, असा इशारा दिला होता. तालिबानचाच भाग असलेल्या ‘तेहरिक-ए-तालिबान’ने पाकिस्तानची सत्ता हस्तगत करण्याची घोषणा करून आपल्या दहशतवादी कारवायांमध्ये वाढ केली आहे. इतकेच नाही तर या कारवायांची जबाबदारीही तेहरिकने उघडपणे स्वीकारलेली आहे. असे असून तालिबानने आत्तापर्यंत तेहरिकने पाकिस्तानात घडविलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध नोंदविलेला नाही.

अफगाणिस्तानातील भयंकर संकटाला जबाबदार असलेल्या पाकिस्तानला याचे परिणाम भोगावे लागतील, हा ‘आयएफएफआरएएस’चा इशारा प्रत्यक्षात उतरू लागल्याचे दिसते आहे. काही दिवसांपूर्वी इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद यांनी ज्या शक्तींनी अफगाणिस्तानचा ताबा घेतला, ती शक्ती लवकरच पाकिस्तानवरही कब्जा मिळवू शकेल, असे बजावले होते.

leave a reply