पुंछ, राजौरीमधील ऑपरेशन आणि निष्पाप नागरिकांच्या हत्यांच्या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख आणि सीआरपीएफचे महासंचालक जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर

लष्करप्रमुखश्रीनगर – लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचा सोमवारी दोन दिवसांचा जम्मू-काश्मीर दौरा सुरू झाला आहे. त्यापाठोपाठ सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह सुद्धा जम्मू-काश्मीर दौर्‍यावर पोहोचले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी संघटनांनी सामान्य नागरिकांचे व स्थलांतरीत मजूरांच्या हत्यांचे सत्र सुरू केले आहे. त्याचवेळी पुंछ व राजौरीतील जंगलांमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठे ऑपरेशन सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून हे ऑपरेशन सुरू असून नऊ जवान शहिद झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुखांचा हा जम्मू-काश्मीर दौरा होत आहे. लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा जम्मू-काश्मीर दौर्‍यावर जाणार आहेत.

गेल्या दोन आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये ११ सामान्य नागरिकांच्या हत्या करण्यात आल्याने सारा देश हादरला आहे. स्थलांतरीत मजूर आणि खोर्‍यातील अल्पसंख्यांकांना लक्ष्य करून त्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. १९९०च्या दशकाप्रमाणे काश्मीर खोर्‍यात पुन्हा पलायन सुरू व्हावे व जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा अशांतता माजावी, असा पाकिस्तानचा डाव आहे. पाकिस्तानच्या इशार्‍यावरच हे हत्यासत्र सुरू झाल्याचे आरोप तपास यंत्रणा करीत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये निर्दोषांच्या हत्येमागे पाकिस्तानचा कुटील डाव आहे. ३७० कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील शांतता आणि स्थैर्य आले आहे. दहशतवादी मारले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकत आहे. धार्मिक कार्यक्रम होत आहेत. दल लेकवर वायुसेनेचा एअर शो पार पडला. नवी इंडस्ट्री धोरण, फिल्म धोरण व रहिवाशी दाखला धोरण लागू झाले आहे. त्यामुळे काश्मीरवर राजकारण आधारलेल्या पाकिस्तानात अस्वस्थता पसरणे स्वाभविक असून त्यामुळे अशा हत्यासत्रांच्या माध्यमातून येथील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत आहे. मात्र पाकिस्तानचा हा डाव त्याच्यावरच उलटेल, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

मात्र सध्यातरी या हत्यासत्रांनंनर जम्मू-काश्मीरमध्ये स्थलांतरीत नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून काही मजूर जम्मू-काश्मीर सोडून पुन्हा आपल्या राज्याकडे परतू लागले आहेत. या पारिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय स्तरावर बैठका होत आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. तत्पूर्वी लष्करप्रमुख जनरल नरवणे आणि सीआरपीएफचे महासंचालक कुलदिप सिंग जम्मू-काश्मीर दौर्‍यावर पोहोचले आहेत. येथे आयबी, एनआयए, लष्कर व सीआरपीएफच्या वरीष्ठ अधिकार्‍यांची बैठक होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये स्थलांतरीत मजूर राहत असलेल्या भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये जलविद्युत प्रकल्प आणि इतर सरकारी संस्थांची कार्यालये दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली ाहे. त्यामुळे विमानतळांसह सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विविध भागात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू असून पुंछमधील ऑपरेशन आठव्या दिवशीही सुरू होते. येथे आता दहशतवाद्यांना शोधण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोन्सची मदत घेतली जात आहे. पुंछ व राजौरीत दहशतवाद्यांची काही ठिकाणे लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. पुंछमधील भाता धुरीया भागात दहशतवाद्यांनी लपण्यासाठी तयार करण्यात आलेले बंकर्स उद्ध्वस्त करण्याच्या आल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीर दौर्‍यावर असलेल्या लष्करप्रमुखांनी पुंछ व राजौरीमधील या ऑपरेशनचाही आढावा घेतला. याशिवाय दहशतवादी आणि त्यांच्या पठिराख्यांवर कारवाईसाठी व त्यांना शोधण्यासाठी सीआरपीएफ व इतर निमलष्करीदलांची तैनाती वाढविण्यात येऊ शकते, अशी बातमी आहे.

leave a reply