अमेरिकेतील दांभिक डावी विचारसरणी, बहिष्काराची संस्कृती फ्रान्ससाठी धोकादायक

- राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह फ्रेंच नेते व विचारवंतांचा इशारा

बहिष्काराची संस्कृती

पॅरिस/वॉशिंग्टन – नियंत्रण सुटलेली दांभिक डाव्या विचारसरणी अमेरिकेतून फ्रान्समध्ये आयात केली जात आहे. त्यापासून आपल्या देशाला फार मोठा धोका संभवतो, असा इशारा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दिला होता. त्याचे पडसाद फ्रान्समध्ये उमटू लागले आहेत. मॅक्रॉन यांच्या राजकीय विरोधक असणार्‍या मरिन ली पेन यांनीही या भूमिकेवरून त्यांना पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी फ्रान्समधील १०० हून अधिक विचारवंतांनी एक खुले पत्र जारी केले असून, अमेरिकेतून येणारी दांभिक डावी विचारसरणी व बहिष्काराची संस्कृती फ्रान्सच्या अस्तित्वासाठी धोका ठरु शकते, असे बजावले आहे.

गेल्या वर्षी फ्रान्समधील प्रसिद्ध पॅरिस ऑपेरामधील कृष्णवर्णिय कलाकारांनी कंपनीत वांशिक विविधता हवी, असे पत्र जारी केले होते. त्याची दखल घेऊन ऑपेराचे नवे प्रमुख अलेक्झांडर नीफ यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात, ऑपेरामध्ये विविध वंशाच्या नागरिकांना स्थान देण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्याचवेळी कंपनीकडून सादर होणार्‍या कलाकृतींमध्ये संवेदनशील मुद्दा असणार्‍या ‘ब्लॅकफेस’चा वापर होणार नाही, अशी ग्वाही दिली. नीफ यांनी प्रसिद्ध केलेल्या या अहवालाने फ्रान्समध्ये पुन्हा एकदा अमेरिकी विचारसरणीच्या चुकीच्या प्रभावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

बहिष्काराची संस्कृतीफ्रान्समधील आघाडीचे दैनिक असणार्‍या ‘ली मॉन्ड’ने फ्रान्स आता हळुहळू अमेरिकेच्या मार्गावर चालल्याचे सांगून तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणताही त्रास होऊ नये म्हणून कलाकार व कार्यक्रमांवर स्वतःहूनच निर्बंध लादण्याची प्रवृत्ती बळावत चालल्याची टीकाही दैनिकाचे संपादक मिशेल गुरिन यांनी केली. फ्रान्समधील आघाडीच्या विरोधी नेत्या मरिन ली पेन यांनीही नीफ यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. वंशवादाला विरोध करण्याच्या नावाखाली कथित उदारमतवादी कसे मूर्खासारखे वागत आहेत, हे यातून दिसते असा टोला ली पेन यांनी लगावला.

अमेरिकेतील विचारसरणी व आंदोलनांच्या फ्रान्समधील प्रभावाचा मुद्दा गेल्या वर्षीपासून चर्चेत आला आहे. अमेरिकेत झालेल्या ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’च्या निदर्शनांना समर्थन देण्यासाठी फ्रान्समध्येही मोर्चे काढण्यात आले होते. बाब मोर्च्यांपुरती मर्यादित न राहता फ्रान्समधील गटांनी देशातील विद्यापीठांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. विशिष्ट विचारवंतांना व्याख्यानासाठी बोलावले जाऊ नये, नाटकात काम करणार्‍या गौरवर्णिय विद्यार्थ्यांनी मुखवटे अथवा ‘डार्क मेकअप’चा वापर करु नये, यासाठी दडपण आणण्याच्या घटना घडल्या.

बहिष्काराची संस्कृतीया घटनांनी फ्रान्समधील राजकीय वर्तुळासह विचारवंतांच्या गटांनी गंभीर दखल घेतली. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी अमेरिकेतून येणार्‍या विचारसरणीचा थेट उल्लेख करून त्याविरोधात सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. तर फ्रान्सचे शिक्षणमंत्री जीन मिशेल ब्लँके यांनी, नजिकच्या काळात अमेरिकेतील विद्यापीठांमधून येणार्‍या विचारसरणीविरोधात फ्रान्सला संघर्ष करावा लागेल, असे बजावले. फ्रान्समधील अनेक विचारवंतांनी खुले पत्र लिहून याला पाठिंबा दिला आहे.

फ्रेंच इतिहासकार पिएरे-आंद्रे टॅगिफ यांनी, अमेरिकेच्या धर्तीवर फ्रान्समध्ये कृष्णवणिर्ंयांचा मुद्दा उपस्थित करणे ही पूर्णपणे कृत्रिम बाब ठरते, असे म्हटले आहे. फ्रान्समधील समाजशास्त्रज्ञ नथाली हेनिश यांनी अमेरिकेतून येणार्‍या चुकीच्या प्रभावाविरोधात उभे राहण्यासाठी एका गटाचीही स्थापना केली आहे. दांभिक डावी विचारसरणी व बहिष्काराच्या संस्कृतीला फ्रान्समध्येच नाही तर जर्मनीसारख्या आघाडीच्या युरोपिय देशामध्येही विरोध होऊ लागला आहे. गेल्याच आठवड्यात जर्मनीतील डाव्या विचारसरणीच्या नेत्या सारा वागक्नेश्ट यांनी, डाव्या विचारसरणीच्या गटांनी आपली ढोंगी, असहिष्णु भूमिका सोडली नाही तर जर्मनीतही अमेरिकेप्रमाणे टोकाची दुफळी असणारे वातावरण तयार होईल, असा खरमरीत इशारा दिला होता.

leave a reply