महाराष्ट्रात संचारबंदीचा कालावधी वाढणार

- महाराष्ट्रात चोवीस तासात ९८५ रुग्ण दगावले

कालावधी वाढणारनवी दिल्ली – महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून लॉकडाऊन सदृष्य निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र यानंतरही दरदिवशी आढळणार्‍या रुग्णसंख्या काही ठराविक भाग वगळता कमी झालेली दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात संंचार निर्बंधांचा कालावधी वाढविण्यावर सर्व मंत्रिमंडळाचे एकमत झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. मात्र हा कालावधीत किती दिवसाने वाढविण्यात येईल याबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाने ९८५ रुग्ण दगावले, तसेच ६३ हजार ३०९ नव्या रुग्णांची नोंद झाली.

देेशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या महिन्यापासून सातत्याने नव्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर दरदिवशी भर पडत असून यामुळे राज्यातील ३० हजारापर्यंत खाली आलेली ऍक्टिव्ह केसेसची संख्या पावणे सात लाखांवर पोहोचली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात दरदिवशी ६० हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. राज्यात दरदिवशी आढळणार्‍या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ५० हजारांपर्यंत पोहोचल्यावर राज्यात संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. १४ एप्रिलला रात्री आठ वाजल्यापासून राज्यात लॉकडाऊन सदृष्य निर्बंध लागू झाले होते, तसे १ मेच्या सकाळपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

पण आता हा निर्बंधांचा कालावधी आणखी सात ते पंधरा दिवसांनी वाढविण्यात येणार आहे. बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात संचार निर्बंध लादल्यानंतर कोरोनाच्या दरदिवशी आढळत असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. तर ही संख्या स्थिर आहे. उलट काही ठिकाणी रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात निर्बंधांचा कालावधी वाढविण्यात यावा, असे मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांचे म्हणणे होते. निर्बंधांचा कालावधी वाढविण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.

मात्र किती दिवसांनी कालावधी वाढवायचा याबाबतचा निर्णय झालेला नाही. आठवड्याने का दोन आठवड्यांनी संचारबंदी वाढवायची यावर ३० एप्रिलपर्यंत निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारपासून बुधवारच्या सकाळीपर्यंत देशात ३ हजार २९३ जण कोरोनाने दगावले. तसेच ३ लाख ६१ हजार नवे रुग्ण आढळले. देशात आतापर्यंत कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे, तसेच एकूण रुग्णांची संख्या १ कोटी ८० लाखांवर पोहोचली आहे. सध्या देशात २९ लाख ७८ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देेेशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून लष्कर, नौदल आणि वायुसेनाही आवश्यक सामुग्री पुरविणे व इतर मदत कार्यात सहभागी झाली आहे. वायुसेना प्रमुख आर.के.एस भदौरिया यांनी बुधवारी पंतप्रधानांची भेट घेतली आणि वायुसेना मदतकार्यासाठी २४ तास सज्ज असल्याची ग्वाही दिली. ऑक्सिजनची वाढलेल्या मागणीच्या तुलनेत पुरवठा करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहे. देशात साडे सातशे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या व्यतिरिक्त आणखी ५०० ऑक्सिजन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) पुढील ३ महिन्यात देशभरात हे ५०० मेडिकल ऑक्सिजन प्रकल्प उभारणार आहे.

leave a reply