अमेरिकेतील सर्वात मोठ्या इंधनवाहिनीवर सायबरहल्ला

इंधनवाहिनीवॉशिंग्टन – अमेरिकेतील सर्वात मोठी इंधनवाहिनी व पुरवठा करणारी यंत्रणा म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘कोलोनिअल पाईपलाईन’वर मोठा सायबरहल्ला चढविण्यात आला आहे. या सायबरहल्ल्यानंतर कंपनीने आपली पाईपलाईन व इंधनपुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या घटनेची माहिती देण्यात आली असून ऊर्जा विभाग व केंद्रीय तपासयंत्रणांनी चौकशी सुरू केल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. अमेरिकेच्या पूर्व भागातील जवळपास नऊ हजार किलोमीटर लांबीच्या या इंधनवाहिनीतून दररोज सुमारे २३ लाख बॅरल इंधनाचा पुरवठा करण्यात येतो.

पूर्व अमेरिकेत न्यूजर्सीपासून ते टेक्सासपर्यंत पसरलेल्या ‘कोलोनिअल पाईपलाईन’वर शुक्रवारी सायबरहल्ला इंधनवाहिनीझाल्याचे समोर आले. हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने आपले पाईपलाईन नेटवर्क पूर्णपणे बंद केले. सायबरहल्ल्याचा तपास करण्यासाठी कंपनीने ‘फायर आय’ या सायबरसुरक्षा कंपनीचे सहाय्य घेतले असून सदर हल्ला ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारच्या हल्ल्यांमध्ये हॅकर्स अथवा त्यांचा गट नेटवर्क व माहितीवर पूर्ण ताबा मिळवून त्याबदल्यात मोठ्या प्रमाणावर खंडणीची मागणी करतो.

गेल्या काही वर्षात अमेरिकेतील रुग्णालये व सरकारी कार्यालयांवर अशा प्रकारचे सायबरहल्ले सातत्याने होत असल्याचे समोर आले आहे. यातील काही प्रकरणांमध्ये खंडणी म्हणून ‘बिटकॉईन’ची मागणी केल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. मात्र कोलोनिअल प्रकरणात खंडणी म्हणून कशाची मागणी करण्यात आली आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

इंधनवाहिनीसध्या या सायबरहल्ल्यामुळे अमेरिकेतील इंधनपुरवठा अथवा त्याच्या दरांवर फरक पडणार नसल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. मात्र पाच दिवस अथवा त्याहून जास्त काळ नेटवर्क बंद राहिल्यास इंधनपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतात, असे सांगण्यात येते.

इंधनवाहिनीवरील सायबरहल्ल्याने अमेरिकेतील सायबरसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेतील सरकारी यंत्रणा तसेच खाजगी कंपन्यांवर मोठे सायबरहल्ले झाल्याचे उघड झाले होते. या हल्ल्यांमागे रशिया तसेच चीनचा हात असल्याची माहिती अमेरिकी प्रशासनाकडून देण्यात आली होती. प्रत्युत्तरादाखल रशियन यंत्रणांवर हल्ल्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र त्यासंदर्भात पुढे हालचाल होण्यापूर्वीच देशातील सर्वात मोठ्या ‘पाईपलाईन नेटवर्क’वर सायबरहल्ला होणे ही बाब अमेरिकी यंत्रणांसाठी मोठी नामुष्कीची घटना ठरली आहे.

leave a reply