चीनच्या फसवणुकीचे दिवस संपले – भारताच्या माजी लष्करप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली – गलवान व्हॅलीतील संघर्ष भडकल्यानंतर सीमावाद शांततेने सोडविण्याचे आवाहन चीनकडून केले जात आहे. पण १९६२ सालच्या युद्धाच्या आधीही चीन अशीच शांततेची भाषा बोलत होता. त्यामुळे शांती आणि वाटाघाटीच्या मार्गाने सीमावाद सोडविण्याची भाषा करणारा चीन दुसऱ्या बाजुने नेहमीच युद्धाची तयारी करीत आला आहे. पण भारताबरोबर युद्धाची शक्यताच नाही, असे चीनने भारताच्या राजकीय व लष्करी नेतृत्त्वला पटवून दिले होते. पण आता मात्र चीनचे कारस्थान उघड झाले असून यापुढे चीन कोणालाही फसवू शकणार नाही, असे माजी लष्करप्रमख जनरल जे. जे. सिंग यांनी बजावले आहे.

फसवणुकीचे दिवस

चीनबरोबरील संपूर्ण सीमाक्षेत्रात भारतीय लष्कर व वायुसेनेने संरक्षणसिद्धता वाढवून कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड देण्याची तयारी ठेवली आहे. त्याचवेळी भारत सरकारने आर्थिक आघाडीवर चीनला धक्के देणारे निर्णय देण्याचा सपाटा लावला आहे. गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर भारताकडून अशी जहाल प्रतिक्रिया उमटेल, असा विचारही चीनने केला नव्हता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने चिनी उत्पादनांवरील भारतीयांच्या बहिष्काराची खिल्ली उडविली होती. भारताला चिनी उत्पादनांखेरीज पर्याय नाही, असे सांगून ग्लोबल टाईम्सने भारतीयांना हिणविले होते. त्याचवेळी भारत लष्करीदृष्ट्या चीनचा सामना करू शकत नाही, असे दावे ग्लोबल टाईम्स व चिनी विश्लेषक आणि मुत्सद्दी सातत्याने करुन देत होते. यासाठी चीनने आपली प्रचारयंत्रणा कामाला लावल्याचे दिसत आहे.

मात्र, भारत सरकार आणि जनतेकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाने चीनला युद्धखोरीची भूमिका स्वीकारणे अवघड होऊन बसले आहे. म्हणूनच सीमाभागातून लष्कर मागे घेण्यास चीनने नकार दिला असला तरी, अधिकृत पातळीवर भारताच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे चीन टाळत आहे. भारताचे पंतप्रधान लेहला भेट देऊन सैनिकांचा उत्साह वाढवित असताना, चीनने वाद चिघळू न देण्याची भूमिका स्वीकारली असून यामागे चीनचे निश्चित असे डावपेच असल्याचे संकेत माजी लष्करी अधिकारी, सामरिक विश्लेषक व जेष्ठ मुत्सद्दी देत आहेत. माजी लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग यांनीही चीनच्या शांततेच्या आवाहनाला कुणीही भुलून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी १९६२ सालचा दाखला दिला.

६२ सालच्या युद्धाआधीही चीनने भारताला शांततेची भाषा बोलून बेसावध ठेवले होते. त्यानंतरच्या काळातही चीन भारताबरोबर युद्धाची शक्यता नाही, असे भासवून भारतीय सीमाभागात घुसखोरी करीतच राहिला. भारताच्या राजकीय व लष्करी नेतृत्त्वाने यावर विश्वासही ठेवला होता, पण आता मात्र चीन भारताची फसवणूक करू शकणार नाही. इतर देशांनीही चीनची लबाडी ओळखली आहे, असे जनरल जे. जे. सिंग यांनी म्हटले आहे. इतर माजी लष्करी अधिकाऱ्यांनीही चीन आपल्या लष्करी सामर्थ्याचा बागुलबूवा उभा करुन भारतासह इतर शेजारी देशांवर दडपण टाकू पाहत असल्याचा शेरा मारला आहे. मात्र, गलवान व्हॅलीतील त्या संघर्षात भारतीय सैनिकांनी चिनी लष्कराची चांगलीच खोड मोडली. त्यामुळे चीनच्या मानसिक दबावतंत्राचा प्रभाव ओसरला आणि भारताने चीनच्या तोडीस तोड लष्करी तैनाती करुन आपली धमक चीनला दाखवून दिली. याचे फार मोठे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत. पुर्वी कधीही नव्हता अशा प्रमाणात चीन दबावाखाली आला आहे, याची नोंद माजी लष्करी अधिकारी व विश्लेषक करीत आहेत.

मात्र, अशा काळात चीनकडून केल्या जाणाऱ्या शांतता व वाटाघाटींच्या प्रस्तावांनी भुलून जाता येणार नाही. तसेच चीनने आगळिक केल्यानंतर प्रतिक्रिया देत राहण्याच्या भुमिकेवरही भारताला फेरविचार करावा लागेल. तसेच चीनच्या विरोधात व्यापक धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी लागेल, असा परखड सल्ला विश्लेषकांनी भारत सरकारला दिला आहे.

leave a reply