अतिवृष्टीतील बळींची संख्या 164 वर पोहोचली

  • 100 जण अजूनही बेपत्ता
  • पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

बळींची संख्या 164 वरमुंबई – महाराष्ट्रातील बळींची संख्या 164 वर पोहोचली आहे. तर अजूनही 100 जणांचा शोध लागलेला नाही. पावसाने गेल्या तीन दिवसांपासून विश्रांती घेतल्याने कोल्हापूरातीलही पूरपरिस्थिती सुधारली आहे. येथील धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबल्याने पुराचे पाणी ओसरले असून वाहतूक सुरू झाली. तर सांगली व सातार्‍यात काही भागात अजून पाणी ओसरलेले नाही. त्यामध्ये हवामानखात्याने पुढील तीन दिवसात कोकण व मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे संकट अजून टळलेले नसल्याने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात झालेल्या तुफानी पावसामुळे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी ओढावलेल्या पूरपरिस्थितीतून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण अजूनही अतिवृष्टीचा धोका कायम आहे. बंगलाच्या उपसागर क्षेत्रातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पर पश्‍चिम किनापरट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र कमी झाल्याने कोकणात पाऊस थांबला असला, तरी हा धोका पूर्णत: टळलेला नाही. येत्या तीन दिवसात घाटमाथ्यांवर पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने पुन्हा नद्यांची पातळी वाढण्याची शक्यता आहे. सातारा आणि सांगलीत अजून परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. येथे काही भागात वातावरण अजूनही खराब आहे व मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे.

या दरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या या अतिवृष्टीमुळे आलेला पूर, दरड व घरे कोसळण्याच्या घटना व इतर दुर्घटनेतील बळींची संख्या 164 वर पोहोचली आहे. महाड तालुक्यातील दरड कोसळलेल्या तळीये गावातील बचावकार्य गावकर्‍यांच्या विनंतीवर थांबविण्यात आले आहे. येथून एनडीआरएफ व इतर बचावपथके मागे घेण्यात आली आहेत. येथून 53 जणांचे मृतदेह सापडले. मात्र 31 जण बेपत्ता आहेत. सात ते आठ फूट खोल मातीचा थर असल्याने हे बचावकार्य अवघड आहे. त्यामध्ये ढीगार्‍याखालून मिळणारे मृतदेह यांची स्थिती खराब असल्याने गावकर्‍यांनीच बेपत्ता असलेल्यांना मृत घोषित करावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे उर्वरीत बेपत्ता 31 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. सातार्‍यातील आंबेघर दुर्घटनेतीलही बेपत्ता असलेल्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील मृतांची संख्या 71 वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील बळी 41 तर, रत्नागिरीत बळी 21 वर गेले आहेत.

ठाण्यात 12, कोल्हापूरात सात, मुंबईत चार, सिंधुदूर्ग, पुणे, वर्धा आणि अकोल्यात प्रत्येकी दोन बळी गेले आहेत. याशिवाय 100 बेपत्ता असलेल्यांमध्ये रायगडातील 53, सातार्‍यातील 27, रत्नागिरीतील 14, ठाण्यातील चार, तर सिंधुदूर्ग व कोल्हापूरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

leave a reply