कोरोनाव्हायरसचा सामना करण्यासाठी संरक्षणदलाची सिद्धता

नवी दिल्ली, ०१ (वृत्तसंस्था ) – देशावर आलेल्या कोरोनाव्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी, संरक्षणदलाला दुप्पटीने काम करण्याचा संदेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला आहे.  बुधवारी संरक्षणमंत्र्यानी तिन्ही दलांच्या प्रमुखांची व संरक्षणदलप्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. यावेळी संरक्षणमंत्र्यानी संरक्षणदलाच्या तयारीचा आढावा घेतला.

या भयंकर साथीच्या विरोधात लढण्याची तयारी संरक्षण दलांनी केली आहे. कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी लष्कराने ९,००० बेड्सची २८ हॉस्पिटल्स सज्ज ठेवली आहे. तसेच ८,५००हून अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी नागरी प्रशासनाला सहाय्य करतील, असे आश्वासन लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी यावेळी दिले.  भारतीय नौदलाच्या युध्दनौका देखील यासाठी सज्ज असल्याची ग्वाही नौदलप्रमुख अँडमिरल करमबीर सिंग यांनी दिली. वायुसेनेने गेल्या तीन दिवसात २५ टन वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा केला आहे.

तसेच वायुसेनेने लडाखमधल्या संशयित रुग्णांच्या  चाचण्यांचे सँम्पल्स नवी दिल्ली इथे एअरलिफ्ट केले. वेळ पडल्यास वायुसेना ‘सी-१७ एस’ , ‘सी- १३० जेएस’ यासारखी विमाने तैनात करीन, असे वायुसेनाप्रमुख भदौरिया यांनी सांगितले. इराण, इटली, मलेशिया यासारख्या देशांमधून परतलेले भारतीय लष्कराच्या कॉरन्टाईन सुविधा केंद्रात आहे. या बैठकीत डीआरडीओ आणि संरक्षणदलाशी संलग्न असलेल्या कंपन्याचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

कोरोनाव्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी डीआरडीओ युध्दपातळीवर काम करीत आहे. डीआरडीओ नँनो टेक्नॉलॉजीवर आधारीत ‘एन- ९९’ मास्क करण्याच्या कामाला लागली आहे. तसेच डीआरडीओ या साथीपासून संरक्षण पुरविणारे इतर साहित्य तयार करीत आहे.  डीआरडीओ एकाच वेळी चार जणांसाठी उपयुक्त ठरेल असे व्हेटिंलेटर विकसित करीत असल्याची माहिती डीआरडीओचे संचालक डॉ सतिश रेड्डी यांनी दिली.

leave a reply