अमेरिकेच्या कोरोनाविरोधातील मोहिमेसाठी ‘डेल्टा व्हेरिअंट’ सर्वात मोठा धोका

- राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सल्लागार अँथनी फॉसी यांचा इशारा

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसचा नवा ‘डेल्टा व्हेरिअंट’ यापूर्वीच्या प्रकाराप्रमाणेच वेगाने फैलावत असून अमेरिकेच्या कोरोनाविरोधातील मोहिमसाठी नवा प्रकार सर्वात मोठा धोका ठरतो, असा इशारा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार अँथनी फॉसी यांनी दिला. अमेरिकेत गेल्या काही दिवसांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी 20 टक्के रुग्णांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ असल्याची माहितीही फॉसी यांनी दिली. दरम्यान, ‘डब्ल्यूएचओ’मध्ये साथीच्या रोगांच्या विशेषज्ञ असणर्‍या डॉ. मारिआ व्हॅन केर्खोव्ह यांनी, ‘डेल्टा व्हेरिअंट’ जगातील तब्बल 92 देशांमध्ये पसरल्याचे बजावले आहे.

अमेरिकेच्या कोरोनाविरोधातील मोहिमेसाठी ‘डेल्टा व्हेरिअंट’ सर्वात मोठा धोका - राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सल्लागार अँथनी फॉसी यांचा इशाराअमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या तीन कोटींवर गेली असून, सहा लाखांहून अधिक जण दगावले आहेत. लसीकरण व इतर उपाययोजनांमुळे अमेरिकेतील रुग्ण व बळींची सरासरी घटत असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सल्लागार फॉसी यांनी दिलेला नवा इशारा पुन्हा चिंता वाढविणारा दिसत आहे.

‘पहिल्यांदा भारतात आढळलेल्या डेल्टा प्रकाराच्या अमेरिकेतील रुग्णांची संख्या 20 टक्के झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी हीच आकडेवारी 10 टक्के होती. ब्रिटनमध्ये सापडलेल्या अल्फा प्रकाराप्रमाणेच नवा प्रकारही वेगाने पसरताना दिसत आहे. दोन आठवड्यांच्या अवधीत रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. अमेरिकेकडून कोरोनाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत हा डेल्टा प्रकार सध्या सर्वात मोठा धोका ठरु शकतो’, असे फॉसी यांनी बजावले. मात्र त्याचवेळी सध्या अमेरिकेत देण्यात येणार्‍या लसी डेल्टा व्हेरिअंटविरोधात उपयुक्त असून अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अमेरिकेच्या कोरोनाविरोधातील मोहिमेसाठी ‘डेल्टा व्हेरिअंट’ सर्वात मोठा धोका - राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सल्लागार अँथनी फॉसी यांचा इशारादरम्यान, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सल्लागार असणार्‍या अँथनी फॉसी यांच्याविरोधात अमेरिकी वर्तुळात सुरू असणार्‍या मोहिमेला वाढते समर्थन मिळताना दिसत आहे. अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहातील रिपब्लिकन संसद सदस्य मार्जोरी टेलर ग्रीन यांनी ‘फायर फॉसी’ नावाचे विधेयक संसदेत सादर केले आहे. सुरुवातीला या विधेयकाला अवघ्या चार सदस्यांनी समर्थन दिले होते. मात्र आता ही संख्या तिपटीने वाढून 13वर पोहोचली आहे. फॉसी व चीनच्या वादग्रस्त वुहान लॅबमधील ईमेल्स समोर आल्यानंतर फॉसी यांना होणारा विरोध वाढत असून विधेयकाला मिळणारे समर्थन त्याचाच भाग दिसत आहे.

गेल्या महिन्यातही अमेरिकेच्या संसदेतून फॉसी यांच्यावर आक्रमक टीकास्त्र सोडण्या आले होते. संसद सदस्य माईक गॅलाघर यांनी फॉसी यांच्यावर टीकास्त्र सोडून वुहान लॅबला दिलेल्या निधीबाबत उत्तरे मिळायला हवीत, अशी मागणी केली होती. तर रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणार्‍या जिम जॉर्डन यांनी फॉसी यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती.

leave a reply