अफगाणिस्तानकडून भारतीय वायुसेनेच्या सहकार्याची मागणी

काबुल – अफगाणिस्तानच्या शहरांवर तालिबानने जबरदस्त हल्ले चढविण्याचे सत्र सुरू केले आहे. अफगाणी लष्कर तालिबानला थोपविण्यासाठी लढत असले, तरी आंतरराष्ट्रीय सहकार्याखेरीज तालिबानचा सामना करणे अफगाणी लष्कराला शक्य होणार नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. यासाठी अफगाणिस्तानच्या सरकारने भारताला साकडे घातले असून भारताने आपल्याला हवाई सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. अफगाणी सरकारमधील सूत्रांनी हा दावा केला असून भारतीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरली आहे.

अफगाणिस्तानकडून भारतीय वायुसेनेच्या सहकार्याची मागणीतालिबानने अफगाणिस्तानच्या काही प्रांतांच्या राजधान्यांचा ताबा घेतला. पुढच्या काळातही तालिबानने अशीच धडक मारली तर अवघ्या काही आठवड्यात तालिबान अफगाणिस्तानची राजधानी काबुलपर्यंत धडकेल, अशी चिंता अमेरिकन गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या सरकारने भारताकडे सहाय्याची मागणी केल्याचे दिसते. भारताच्या वायुसेनेने आपल्याला सहाय्य पुरवावे, असे अफगाणिस्तानच्या सरकारला वाटत असून तसे आवाहन भारताला करण्यात आली आहे. अफगाणी सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली. याआधी भारताने आपल्याला लष्करी सहाय्य पुरवावे अशी मागणी अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष सालेह, परराष्ट्रमंत्री अत्मार आणि अफगाणिस्तानच्या भारतातील राजदूतांनी केली होती. पण हवाई सहकार्याबाबतच्या बातमीला अद्याप अधिकृत पातळवर दुजोरा मिळालेला नाही.

भारत अफागणिस्तानात लष्करी तैनाती करण्याच्या तयारीत असल्याचे दावे पाकिस्तानच्या माध्यमांनी केले होते. काही पाकिस्तानी विश्‍लेषक तर तालिबानवर होत असलेल्या हवाई हल्ल्यामागे भारत असल्याचा आरोप करीत आहेत. तालिबानने याबाबत भारतावर आरोप केलेला नाही. तरीही अफगाणिस्तानच्या सरकार व लष्कराला वाचविण्यासाठी भारताने तालिबानवर हे हवाई हल्ले चढविल्याचे सांगून पाकिस्तानी विश्‍लेषक तालिबानला भारताच्या विरोधात चिथावणी देत आहेत. अफगाणिस्तानच्या लोकनियुक्त सरकारला आपला पाठिंबा असेल, असे भारताने जाहीर केले. तसेच कुठल्याही परिस्थितीत भारत अफगाणी जनतेला वार्‍यावर सोडणार नाही, अशी ग्वाही भारतीय नेत्यांनी दिली होती. मात्र याचा अर्थ भारत अफगाणिस्तानात लष्करी हस्तक्षेप करील, असा होत नाही.

तालिबानच्या विरोधात अफागाणी सरकार व लष्कराला सहाय्य करण्यासाठी भारतासमोर इतर अनेक पर्याय आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानचा रक्तपात व त्यामागे असलेले पाकिस्तानचे कारस्थान जगजाहीर करून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष याकडे केंद्रीत करण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत विशेष बैठक आयोजित करून भारताने अफगाणिस्तानातील या परिस्थितीकडे जगाचे लक्ष वेधले होते. त्याचा परिणाम दिसू लागला असून तालिबानला आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारा विरोध वाढत चालला आहे. तालिबानने बळाचा वापर करून अफगाणिस्तानचा ताबा घेतला, तर त्याला पाकिस्तान मान्यता देणार नाही, असे पाकिस्तानलाही जाहीर करावे लागले होते.

मात्र अफगाणिस्तानच्या सरकारने केलेल्या मागणीला प्रतिसाद देऊन भारत या देशाला लष्करी सहाय्य करणार का, या प्रश्‍नाचे अधिकृत पातळीवर अजूनही उत्तर मिळालेले नाही. माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषक देखील या विषयावर परस्परविरोधी विचार व्यक्त करीत आहेत.

leave a reply