‘वुहान लॅब’संदर्भातील नव्या पुराव्यांच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन यांचे सल्लागार असणार्‍या अँथनी फॉसींना हटविण्याची मागणी

वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे सल्लागार असणार्‍या अँथनी फॉसी यांनी चीनच्या वुहान लॅबला दिलेल्या निधीबाबत नवे पुरावे समोर आले आहेत. या पुराव्यांचा हवाला देत फॉसी अमेरिकी संसदेसमोर खोटे बोलल्याचा आरोप सिनेटर रँड पॉल यांनी केला आहे. या खोटेपणाबद्दल फॉसी यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणीही सिनेटर पॉल यांनी केली आहे.

अमेरिकेतील ‘द इंटरसेप्ट’ या वेबसाईटने अमेरिकी प्रशासनाकडून चीनच्या लॅब देण्यात आलेल्या निधीबाबतची ९०० हून अधिक पानांचा समावेश असलेली कागदपत्रे खुली केली आहेत. या कागदपत्रांमध्ये ‘इको हेल्थ अलायन्स’ व अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी ऍण्ड इन्फेक्शिअस डिसिज्’ या संस्थेचे नाव आहे. अँथनी फॉसी यांनी या संस्थेचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्याच कारकिर्दीत जवळपास ३१ लाख डॉलर्सचा निधी मंजूर झाला होता. यातील सुमारे सहा लाख डॉलर्सचा निधी ‘वुहान लॅब’ला ‘बॅट कोरोनाव्हायरस रिसर्च’साठी देण्यात आला होता, असे कागदपत्रांमधून उघड झाले आहे.

सल्लागार अँथनी फॉसी यांनी गेल्या काही महिन्यात संसदेसमोर झालेल्या सुनावण्यांमध्ये चीनच्या ‘वुहान लॅब’ला ‘गेन ऑफ रिसर्च’ प्रकाराअंतर्गत निधी दिल्याचे वारंवार नाकारले होते. सिनेटर रँड पॉल यांच्यासह अमेरिकेतील अनेक संसद सदस्यांनी फॉसी यांना याविषयी वारंवार प्रश्‍न विचारले होते. मात्र त्यांनी सातत्याने ‘वुहान लॅब’च्या निधीशी असलेला संबंध नाकारला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘वुहान लॅब’ला देण्यात येणारा निधी थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर फॉसी यांनी त्याला विरोध केल्याचे काही दिवसांपूर्वीच उघड झाले होते. मात्र तरीही फॉसी यांच्याकडून नकारघंटा कायम होती.

या पार्श्‍वभूमीवर ‘द इंटरसेप्ट’ने उघड केलेली कागदपत्रे, अँथनी फॉसी कोरोनाव्हायरसचे मूळ असलेल्या ‘वुहान लॅब’ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते, या आरोपांना नव्याने बळ देणारी ठरली आहेत. सिनेटर रँड पॉल यांनी ट्विटरवरून ‘फॉसी लाईड अगेन’ असे ट्विट करून नव्या पुराव्यांचा उल्लेख केला आहे. त्याचवेळी आपण यासंदर्भात मांडत असलेले मुद्दे बरोबर होते, हे पुन्हा सिद्ध झाल्याचा दावाही केला. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत, सिनेटर पॉल यांनी फॉसी संसदेसमोर खोटे बोलल्याचा उघड आरोप करून त्यांच्या हकालपट्टीची मागणीही केली.

रँड पॉल यांच्यापूर्वी, रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणार्‍या जिम जॉर्डन यांनी फॉसी यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. तर, अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहातील रिपब्लिकन संसद सदस्य मार्जोरी टेलर ग्रीन यांनी ‘फायर फॉसी’ नावाचे विधेयकही संसदेत सादर केले होते.

अमेरिका व युरोपिय देशांसह जगातील प्रमुख देशांनी कोरोनाव्हायरसचा उगम चीनमधूनच झाल्याचा ठपका ठेवला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमधूनच झाल्याचा उघड आरोप केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच संशोधकांनी वुहान प्रयोगशाळेकडेच बोट दाखविले होते. चीनमधून बाहेर पडलेल्या एका संशोधिकेनेही आपल्याकडे यासंदर्भात पुरावे असल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकी यंत्रणांना ‘वुहान लॅब लीक’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ‘डब्ल्यूएचओ’ने चीनला दोनदा तपासाच्या नव्या टप्प्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. मात्र चीनने दोन्ही वेळेस ही मागणी नाकारली आहे.

leave a reply