तुर्कीतील ‘एस-४००’ हवाईसुरक्षा यंत्रणा सदोष असल्याने तैनाती लांबली

- ग्रीक वेबसाईटचा दावा

इस्तंबूल/अथेन्स – तुर्कीने रशियाकडून खरेदी केलेली प्रगत ‘एस-४००’ हवाईसुरक्षा यंत्रणा सदोष असल्याने ती अद्याप तैनात करण्यात आली नसल्याचा दावा ग्रीसच्या न्यूज वेबसाईटवर करण्यात आला आहे. तुर्कीने २०१७ साली २.५ अब्ज डॉलर्सचा करार करून रशियाकडून ‘एस-४००’ खरेदी केली होती. यावर्षी मार्च महिन्यात ही यंत्रणा पूर्णपणे सक्रिय होणे अपेक्षित होते. पण त्यातील दोष समोर आल्याने तैनाती लांबल्याचे वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तुर्कीतील प्रगत यंत्रणा सदोष असल्याचे समोर येत असतानाच, रशियाने ग्रीसला ‘एस-३००’ या हवाईसुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करून देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती उघड झाली आहे.

तुर्कीतील 'एस-४००' हवाईसुरक्षा यंत्रणा सदोष असल्याने तैनाती लांबली - ग्रीक वेबसाईटचा दावाग्रीसमधील ‘पेंटापोस्टॅग्मा जीआर’ या न्यूज वेबसाईटने तुर्कीतील सदोष ‘एस-४००’चे वृत्त प्रसिद्ध केले. तुर्कीच्या परराष्ट्र विभागाने रशियन ‘एस-४००’ यंत्रणा अजूनही तैनात न केल्याच्या दाव्यांना दुजोरा दिल्याचे ग्रीक वेबसाईटने म्हंटले आहे. या यंत्रणेत असलेला दोष तुर्की लष्कराला माहीत आहे, पण गेले सहा महिने ते त्यावर उपाय शोधू शकलेले नाहीत, असा दावा वेबसाईटवरील वृत्तात करण्यात आला आहे. रशियन सूत्रे व माध्यमांतून याची पुष्टी झाल्याचा हवालाही देण्यात आला आहे. तुर्कीने रशियन तज्ज्ञ व अभियंत्यांनाही प्रवेश नाकारला असून, नवी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बसविण्यासही नकार दिला आहे.

तुर्की लष्कराकडे ‘एस-४००’ सक्रिय करण्याचा अनुभव अथवा पुरेशी माहिती नाही. सध्याच्या परिस्थितीत ही यंत्रणा कार्यरत करायची असेल तर रशियन तज्ज्ञांशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र रशियन पथक यंत्रणेत वेगळे बदल घडवेल, या भीतीने तुर्की त्यांना परवानगी देण्याचे नाकारत असून, यासाठी नाटोनेही दबाव आणल्याचे मानले जाते. तुर्कीचे मंत्री व अधिकारी ‘एस-४००’ तैनात करण्याची खात्री देत असले तरी परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचा दावा रशियन विश्लेषकांकडून करण्यात येत आहे, असे ग्रीक वेबसाईटच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. ‘एस-४००’ तैनात करून त्याचा वापर केल्यास अमेरिका नवे निर्बंध लादेल, अशीही भीती तुर्कीला असल्याचा दावा वेबसाईटवर करण्यात आला आहे.

तुर्कीतील 'एस-४००' हवाईसुरक्षा यंत्रणा सदोष असल्याने तैनाती लांबली - ग्रीक वेबसाईटचा दावासध्या भूमध्य सागरी क्षेत्रात तुर्कीच्या कारवायांमुळे, तुर्की व ग्रीसमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. त्याचवेळी लिबीयातील तुर्कीच्या हस्तक्षेपावर इजिप्त व ‘युएई’ नाराज असून त्यांनी तुर्कीविरोधात मोहीम छेडण्याचा इशारा दिला आहे. दोन आघाड्यांवर संघर्षाची शक्यता असताना ‘एस-४००‘ सारखी प्रगत यंत्रणा तैनात करणे तुर्कीसाठी निर्णायक ठरले असते. मात्र तरीही तुर्कीने अद्याप ही यंत्रणा तैनात न करणे आणि ती सदोष असल्याचे तसेच त्यावरून रशियाबरोबर तणाव असल्याचे दावे समोर येणे लक्ष वेधून घेणारे ठरते. भूमध्य सागरी क्षेत्रातील तणावावरून तुर्कीने माघार घ्यावी, यासाठी युरोप तसेच अमेरिकेकडून प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे. अशा स्थितीत लष्करी आघाडीवर ‘एस-४००’चे अपयश तुर्कीसाठी मोठा धक्का ठरतो.

दरम्यान, तुर्कीची ‘एस-४००’ अपयशी ठरत असतानाच ग्रीसने घेतलेल्या ‘एस-३००’ या हवाईसुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करून देण्याबाबत रशियाने तयारी दर्शविली आहे. ग्रीसने यासंदर्भात रशियाला विनंती केली होती व सध्या दोन देशांमध्ये यावर चर्चा सुरू झाल्याचा दावा ग्रीक माध्यमांनी केला आहे. या आधुनिकीकरणा अंतर्गत ग्रीसला नवे कमांड व कंट्रोल स्टेशन आणि प्रगत रडार्स मिळतील, असे संकेत देण्यात आले आहेत. ग्रीसकडून या हालचाली सुरू असतानाच, तुर्कीने ग्रीस भूमध्य सागरातील बेटांचे लष्करीकरण करीत असल्याचा आरोप केला आहे. भूमध्य सागरी क्षेत्रात ग्रीस व तुर्कीमध्ये असलेल्या २३ पैकी १८ बेटांवर ग्रीसने मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनाती केल्याचे तुर्कीने म्हंटले आहे. ग्रीसची ही तैनाती यापूर्वी झालेल्या कराराचे उल्लंघन असल्याचा दावाही तुर्कीने केला.

leave a reply