लडाखच्या ‘एलएसीवर’ नौदलाच्या ‘मार्कोस’ची तैनाती

नवी दिल्ली – ‘स्पेशल फोर्सेस’सह लष्कराचे ‘पॅरा’ वायूसेनेच्या ‘गरूड’ यांच्यानंतर आता भारतीय नौदलाचे ‘मार्कोस’चे पथक देखील लडाखच्या एलएसीवर तैनात करण्यात आले आहे. पँगाँग सरोवर क्षेत्रात ‘मार्कोस’चे पथक गस्त घालणार असून त्यांच्यासाठी विशेष बोटी देखील इथे लवकरच पाठविण्यात येणार आहेत. यामुळे लडाखच्या एलएसीवर तिन्ही संरक्षणदलांच्या कमांडोज्‌ची पथके चीनची कारस्थाने हाणून पाडण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहेत.

‘मार्कोस’

लडाखच्या एलएसीवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चीनने सैन्य माघारी घेण्याची तयारी दाखविली होती. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत चीनने ही बाब मान्य केली होती व टप्प्याटप्प्याने सैन्यमाघारीवर एकमत झाल्याचे दावे करण्यात येत होते. पण प्रत्यक्षात चीनने ‘एलएसी’वरून आपले जवान माघारी न घेता नवी तैनाती सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. इतकेच नाही तर चीनने भारताच्या सीमेलगत तिबेटमधील आपली लष्करी सज्जता वाढविल्याचे दावे केले जातात. याबरोबरच चीनने एलएसीवरील अद्ययावत रडारयंत्रणा तैनात केल्याच्याही बातम्या आहेत.

यामुळे चीनच्या हेतू इथला तणाव कमी करणे हा नसून भारतीय सैन्याच्या माघारीचा लाभ उचलण्याची तयारी चीनकडून केली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. माजी लष्करी अधिकाऱ्यांनी चीनवर जराही विश्‍वास ठेवता येणार नाही, असे वारंवार बजावले होते. अशा परिस्थितीत पँगाँग सरोवराचा वापर करून चीन भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याची दाट शक्यता काहीजणांकडून वर्तविण्यात येत होती. पण या सरोवर क्षेत्रासाठी भारतीय नौदलानेही तैनाती करून इथली सुरक्षा सुनिश्‍चित केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

आता नौदलाचे विशेष पथक असलेल्या ‘मार्कोस’ची तैनाती पँगाँग सरोवरक्षेत्रात करण्यात आली आहे. इतकेच नाही तर या पथकासाठी अत्याधुनिक बोटी देखील पाठविण्यात येणार आहे. यामुळे या सरोवरक्षेत्रातील गस्त अधिक प्रभावी बनेल. गेल्या सात महिन्यांपासून ‘स्पेशल फ्रंटियर फोर्सेस’ तसेच ‘पॅरा फोर्सेस’ लडाखच्या एलएसीवर तैनात करण्यात आले आहेत. 29 व 30 ऑगस्ट रोजी स्पेशल फ्रंटियर फोर्स’च्या जवानांनी पँगाँग सरोवर क्षेत्राच्या दक्षिणेकडील मोक्याच्या टेकड्यांचा ताबा घेऊन चीनला हादरा दिला होता.

चिनी लष्कराच्या जवानांना काही कळण्याच्या आत ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’चे कमांडोज्‌ या टेकड्यांवर तळ ठोकले होते. त्यांच्यावर हल्ला चढवून चिनी जवानांनी या टेकड्या ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्नही करून पाहिला. मात्र पुढच्या वेळेस असे प्रयत्न झाले तर गोळीबार केला जाईल, असा सज्जड इशारा मिळाल्यानंतर चीनच्या जवानांना इथून माघार घ्यावी लागली होती. तर लडाखच्या एलएसीवरील काही भागांमध्ये चीनच्या हवाई घुसखोरीची शक्यता बळावल्यानंतर, वायूसेनेच्या ‘गरुड कमांडोज्‌’ची तैनाती या क्षेत्रात करण्यात आली होती. देशाच्या तिन्ही संरक्षणदलांची एलएलसीवरील ही तैनाती चीनला सज्जड इशारा देत आहे. संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत व वायुसेनाप्रमुख आर.के.एस. भदौरीया यांनी तिन्ही संरक्षणदलांमध्ये संपर्क व समन्वय असल्याची ग्वाही देशाला दिली होती. एलएसीवर याचा प्रत्यय येत आहे.

leave a reply