सीमेवर शांती असली तरी, भारतीय लष्कर सावध आहे

- लष्करप्रमुखांचा शेजारी देशांना संदेश

नवी दिल्ली – फेब्रुवारी महिन्यात लडाखच्या एलएसीवरून सैन्यमाघार घेण्याचा निर्णय झाल्यानंतर इथली परिस्थिती सुरळीत होत असल्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी म्हटले आहे. मात्र भारतीय लष्कर कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले. तसेच काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर देखील संघर्षबंदीनंतर शांतता असल्याचे सांगून लष्करप्रमुखांनी देशाला आश्‍वस्त केले. सध्या चीन व पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर भारताला एकाच वेळी आव्हान मिळेल, याची चर्चा सुरू असताना, लष्करप्रमुखांनी इथली परिस्थिती नियंत्रणा असल्याचा संदेश दिल्याचे दिसत आहे. त्याचवेळी लष्कर कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची जाणीवही लष्करप्रमुखांनी करून दिली.

सीमेवर शांती असली तरी, भारतीय लष्कर सावध आहे - लष्करप्रमुखांचा शेजारी देशांना संदेशगेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारत आपल्यावर हल्ला चढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भारताने लडाखच्या एलएसीवर अतिरिक्त तैनाती केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. ही अतिरिक्त 50 हजार सैनिकांची तैनाती चीनलाही अस्वस्थ करणारी ठरली. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने याची गंभीर दखल घेतली व भारताने चीनच्या विरोधात आक्रमक धोरण स्वीकारू नये, असा इशारा दिला. तसेच चीनच्या विरोधातील आक्रमकता भारतासाठीच घातक ठरेल, असे चीनच्या मुखपत्राने बजावले होते. तर भारताच्या या तैनातीवर पाकिस्तानच्या विश्‍लेषकांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली.

लडाखमध्ये भारत हजारो सैनिकांची करीत असलेली ही तैनाती, चीनसाठी नसून पाकिस्तानसाठीच असल्याचा दावा या विश्‍लेषकांनी केला होता. भारत लवकरच पाकिस्तानव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी हल्ला चढविणार आहे, आपला बचाव करण्यासाठी पाकिस्तानकडे फारसा अवधी राहिलेला नाही, असा दावा या विश्‍लेषकांनी केला. रविवारी जम्मूमधील वायुसेनेच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे कारण पुढे करून भारत नक्कीच पाकिस्तानवर कारवाई करील, अशी चिंता पाकिस्तानचे इतर पत्रकार व विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. तसेच भारताच्या या हल्ल्याला अमेरिका व इस्रायल हे देश साथ देतील, अशी चिंता या पत्रकार व विश्‍लेषकांनी व्यक्त केली होती.

पाकिस्तान आणि चीनकडून आलेल्या या प्रतिक्रियांमुळे भारत युद्धाची फार मोठी तयारी करीत असल्याचा प्रचार सुरू झाला होता. अमेरिकेच्या राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या एका पाकिस्तानी वंशाच्या विश्‍लेषकाने तर भारताने जम्मू-काश्मीरच्या सीमेवर हजारो बंकर्स उभारले आहेत, ते याच कारणासाठी असल्याचे सांगून पाकिस्तानच्या चिंतेत भर घातली होती. लवकरच पाकिस्तानव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारत हल्ला चढविल्यावाचून राहणार नाही, असे या विश्‍लेषकाने बजावले होते. यामुळे सध्या पाकिस्तानची माध्यमे भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या चिंतेने धास्तावलेली आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, भारत स्वतःहून युद्धाची सुरूवात करणार नाही, असा संदेश लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांच्या विधानांद्वारे दिला जात आहे. चीनलगतच्या एलएसीवर फेब्रुवारी महिन्यानंतरची परिस्थिती सामान्य बनत असल्याचे जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले. फेब्रुवारी महिन्यातच लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी सैन्यमाघारीचा प्रस्ताव मान्य केला होता. तसेच काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर देखील संघर्षबंदी लागू झाल्यानंतर घुसखोरी थांबलेली आहे, असे सांगून इथेही शांतता असल्याचे जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी भारतीय लष्कर कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा करून जनरल नरवणे यांनी शेजारी देशांना भारत सावध आहे, असा संदेश दिला आहे.

leave a reply