अफगाणिस्तानच्या भवितव्यासाठी दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करा

- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन

आश्रयस्थानेनवी दिल्ली – अफगाणिस्तानात काबूलच्या उत्तरेकडे मुलींच्या शाळेजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ६८ जणांचा बळी गेला असून यातील विद्यार्थीनींची संख्या मोठी असल्याचे बोलले जाते. जगभरातून या हल्ल्याची निर्भत्सना केली जात आहे. भारतानेही या हल्ल्याचा निषेध केला असून हा अफगाणिस्तानच्या भवितव्यावर झालेला हल्ला ठरतो, अशी जळजळीत टीका केली आहे. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करण्याची व अफगाणिस्तानात व्यापक संघर्षबंदीची तातडीने आवश्यकता असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे.

शनिवारी दुपारच्या सुमारास काबूलच्या उत्तरेकडे असलेल्या सयेद अल-शुहादा या शाळेजवळ बॉम्बस्फोट झाले. या भयंकर हल्ल्यात ६८ जणांचा बळी गेला. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारलेली नाही. मात्र हा हल्ला तालिबाननेच घडविल्याचा आरोप अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी केला. या हल्ल्यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बळी गेलेल्या या मुलींबद्दल संवेदना व्यक्त केल्या असून त्यांच्या नातलगांच्या दुःखात भारत सहभागी असल्याचे म्हटले आहे.

या मुलींच्या शाळेवरचा हा हल्ला म्हणजे अफगाणिस्तानच्या भवितव्यावरील हल्ला ठरतो. गेल्या दोन दशकांच्या यातनामय संघर्षात अफगाणी जनतेने फार मोठे बलिदान देऊन जे काही कमावले आहे, त्यालाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न या हल्लेखोरांनी केलेला आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने नष्ट करण्याची व व्यापक संघर्षबंदीची तातडीने आवश्यकता आहे, हे सिद्ध झाल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

अफगाणिस्तानातील दहशतवादाचे मूळ या देशात नसून पाकिस्तानातच आहे, असे भारत व अफगाणिस्तानचे सरकार सातत्याने सांगत आले आहेत. अफगाणिस्तानात घातपात घडविणार्‍या तालिबानची सुरक्षित आश्रयस्थाने पाकिस्तानात असल्याचे आरोप अमेरिकन नेते उघडपणे करू लागले आहेत. इतकेच नाही तर पाकिस्तानकडून तालिबानला दिले जाणारे हे सहाय्यच अफगाणिस्तानात अमेरिकेला मिळालेल्या अपयशाला जबाबदार असल्याचे घणाघाती आरोप होत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर, तालिबान अफगाणिस्तानात करीत असलेल्या रक्तपाताला पाकिस्तानच जबाबदार असल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्रालय वेगळ्या शब्दात मांडत आहे.

अफगाणिस्तानच्या शांततेसाठी अफगाणी भूमी व सभोवतालच्या क्षेत्रात शांतता आवश्यक असल्याचे सूचक उद्गार काही आठवड्यांपूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काढले होते. त्यालाही हीच पार्श्‍वभूमी आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अफगाणी लष्कर व तालिबानमध्ये पेटलेल्या संघर्षात तालिबानच्या बाजूने लढणारे पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याचे समोर येत आहे. त्यांची संख्याही अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने उघड केली जाते. यामुळे तालिबानच्या मागे पाकिस्तान असल्याची बाब नव्याने सिद्ध होत आहे. त्याचवेळी आधुनिक लोकशाहीवादी राज्यव्यवस्था व मुलींचे शिक्षण आणि महिलांना समान अधिकार याला तालिबानचा कडवा विरोध असल्याची बाब याआधी समोर आली होती. त्यामुळे तालिबान शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करीत असल्याचे गेल्या काही महिन्यात उघड झाले होते. त्यामुळे अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या हाती गेल्यास, हा देश पुन्हा रसातळाला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. म्हणूनच तालिबानबरोबर अफगाणी फौजांचा संघर्ष सुरू असताना, स्थानिक देखील हातात शस्त्रे घेऊन तालिबानच्या विरोधात खडे ठाकल्याच्या बातम्या येत आहेत.

leave a reply