अमेरिका व ऑस्ट्रेलियाबरोबर फ्रान्सचा वाद पेटलेला असताना भारताच्या पंतप्रधानांशी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची चर्चा

फ्रान्सचा वादनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून चर्चा पार पडली. इंडो-पॅसिफिक आणि अफगाणिस्तानातील घडामोडींवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचे सांगितले जाते. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेमधील ‘ऑकस’ सहकार्यामुळे ऑस्ट्रेलियाबरोबरील ४० अब्ज डॉलर्स इतक्या रक्कमेचे पाणबुड्यांचे कंत्राट फ्रान्सने गमावले आहे. यानंतर खवळलेल्या फ्रान्सने ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील आपले राजदूत मायदेशी बोलावून घेतले होते. या पार्श्‍वभूमीवर, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भारताच्या पंतप्रधानांबरोबरील ही चर्चा धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची ठरते.

ऑस्ट्रेलिया, ब्रिटन व अमेरिकेतील ऑकस या सहकार्याची घोषणा झाली. हे त्रिपक्षीय लष्करी सहकार्य असून चीनपासून ऑस्ट्रेलियाला असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, या सहकार्याचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियाचा चीनबरोबरील वाद चिघळला असून दोन्ही देश एकमेकांना धक्के देणारे निर्णय घेत आहेत. याचा परिणाम उभय देशांमधील व्यापारावर झालेला आहे. लवकरच या व्यापारयुद्धाचे प्रत्यक्ष युद्धात रुपांतर होऊ शकते, असे दावे केले जातात. या पार्श्‍वभूमीवर, ऑस्ट्रेलियासाठी ऑकस सहकार्याला फार मोठे महत्त्व आले आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाने फ्रान्सकडून पाणबुड्या खरेदी करण्याचा सुमारे ४० अब्ज डॉलर्सचा करार रद्द करून टाकला. त्याऐवजी आता ऑस्ट्रेलिया अमेरिकेकडून आण्विक पाणबुड्या खरेदी करणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयावर फ्रान्सने संताप व्यक्त करून ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील आपल्या राजदूतांना मायदेशी बोलावून घेतले. तसेच युरोपिय महासंघाच्या सहकार्याने फ्रान्स अमेरिका व ऑस्ट्रेलियाला धडा शिकविण्याची तयारी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर चर्चा पार पडली. भारताचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या दौर्‍यावर चालले आहेत. या दौर्‍यात त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा पार पडेल. त्यानंतर भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांच्या राष्ट्रप्रमुखांची चर्चा संपन्न होणार आहे. या दौर्‍याच्या आधी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरची पंतप्रधान मोदी यांची चर्चा लक्षवेधी ठरते. याचे सर्वच तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा मुद्दा तसेच अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांची चर्चा पार पडल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, अमेरिका व ऑस्ट्रेलियाकडून दुखावला गेलेला फ्रान्स भारताबरोबरील आपले सहकार्य दृढ करण्यासाठी अधिक आक्रमक प्रयत्न करणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. आधीपासूनच भारत व फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी विकसित झालेली आहे. पण पुढच्या काळात फ्रान्स याच्याही पुढे जाऊन भारताला संरक्षणविषयक अतिप्रगत तंत्रज्ञान पुरवू शकेल, असे दावे काहीजणांकडून केले जातात. फ्रान्स व अमेरिका-ऑस्ट्रेलियामधील या वादाचा परिणाम भारत-फ्रान्स-ऑस्ट्रेलियामधील त्रिपक्षीय सहकार्यावर होऊ शकतो, अशी चिंता विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे.

leave a reply