ब्रिटन व अमेरिकेच्या गुप्तचरप्रमुखांच्या भारतभेटीनंतर भारत व रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चर्चा

नवी दिल्ली – ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा ‘एमआय६’चे प्रमुख व त्यानंतर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’च्या प्रमुखांनी भारताला भेट दिली होती. यानंतर आता रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोलाय पत्रुशेव्ह भारतात आले असून त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी चर्चा पार पडली. या भेटीगाठी व चर्चा अफगाणिस्तानातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर सुरू आहेत. तालिबानने सरकार स्थापनेचा निर्णय घोषित केल्यानंतर या घडामोडींचा वेग वाढल्याचे दिसते.

तालिबानने सरकार स्थापनेची घोषणा करून आपल्या ३३ मंत्र्यांची नावे व खातेवाटप जाहीर करून टाकले. यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर तालिबानने अफगाणिस्तानातील इतर वांशिक गटांना आपल्या सरकारमध्ये स्थान दिलेले नाही. तालिबानचे दहशतवादी आपल्या अधिकारांसाठी निदर्शने करणार्‍या महिलांवर बेछूट गोळीबार करीत आहेत. त्यामुळे तालिबानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला असून तालिबानच्या सरकारमध्ये अफगाणिस्तान दहशतवाद व कट्टरवादाचे जागतिक केंद्र बनेल, हे आता स्पष्टपणे दिसते आहे.

याचा फार मोठा धोका अफगाणिस्तानच्या शेजारी देशांना संभवतो. पण युरोपिय देश आणि अमेरिकेही अफगाणिस्तानातून फैलावणार्‍या दहशतवाद व कट्टरवादापासून सुरक्षित राहू शकणार नाहीत, असे इशारा जबाबदार देशांच्या गुप्तचर संस्थांचे आजीमाजी अधिकारी देत आहेत. म्हणूनच अफगाणिस्तानातील परिस्थितीवर नजर ठेवून असलेल्या अमेरिका, रशिया, ब्रिटन या देशांनी भारताबरोबर चर्चा सुरू ठेवली आहे. गोपनीय माहितीच्या संदर्भातील या चर्चेचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

ब्रिटनची गुप्तचर संघटना ‘एमआय६’चे प्रमुख रिचर्ड मूर यांनी गेल्या आठवड्यात भारताला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी अफगाणिस्तानवर चर्चा केली. या चर्चेचे तपशील देण्यास ब्रिटनने नकार दिला आहे. गुप्तचर विभागाच्या संदर्भातील चर्चेचे तपशील जगजाहीर केले जाऊ शकत नाही, असे ब्रिटनने म्हटले आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी अमेरिकेच्या ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स नवी दिल्लीत दाखल झाले.

सीआयएप्रमुख बर्न्स यांनी अजित डोवल यांची भेट घेऊन अफगाणिस्तानवर चर्चा केली. या चर्चेचे तपशील सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. याला काही तास उलटत नाही तोच, बुधवारी रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोलाय पत्रुशेव्ह यांनी नवी दिल्लीत येऊन भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केली. अफगाणिस्तानातील घडामोडी हाच या चर्चेतला मुख्य मुद्दा होता.

अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे रशियाबरोबरच मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेला गंभीर धोका संभवतो, हा मुद्दा डोवल व पत्रुशेव्ह यांच्या या चर्चेत होता. अफगाणिस्तानवरील तालिबानचे राज्य पाकिस्तानसारख्या दहशतवादाचा पुरस्कार करणार्‍या देशाला भारताच्या विरोधात मिळालेली फार मोठी संधी ठरेल, असे भारताचे म्हणणे आहे. फार आधीपासून भारत या धोक्याची जाणीव जगभरातील प्रमुख देशांना करून देत आला आहे. हा धोका प्रत्यक्षात उतरत असताना, अमेरिका, रशिया व ब्रिटनच्या गुप्तचर व सुरक्षा यंत्रणेच्या प्रमुखांची भारताबरोबरील चर्चा ही फार मोठी बाब ठरते.

leave a reply