तालिबानशी पाकिस्तानचा संबंध जोडू नका – पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

इस्लामाबाद – ‘पाकिस्तानचा तालिबानशी संबंध नाही. तालिबान पाकिस्तानचे फेव्हरेट नाहीत’, अशी घोषणा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केली. अफगाणिस्तानविषयक चर्चेत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली ही विधाने मोठ्या फेरबदलाचे संकेत देतात. आत्तापर्यंत तालिबानची पाठराखण करणार्‍या पाकिस्तानच्या भूमिकेत व धोरणात होत असलेला बदल लक्षणीय ठरतो. त्याचवेळी यापुढे अफगाणिस्तानात जे काही होईल, त्याला पाकिस्तान जबाबदार नसेल, असे सांगून शाह महमूद कुरेशी यांनी आपल्या देशाचा शक्य तितका बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

तालिबानशी संबंध‘पाकिस्तान तालिबानला पाठिंबा देत असल्या समज रूढ झाला आहे. या देशात आम्हाला तालिबानीकरण करायचे नाही. तालिबानी अफगाणिस्तानचे आहेत आणि आमचा देश पाकिस्तान आहे. पाकिस्तानचा तालिबानशी संबंध जोडू नका’, असे कळकळीचे आवाहन शाह महमूद कुरेशी यांनी केले. याच्या काही दिवस आधी कुरेशी यांनी यापुढे अफगाणिस्तानात जे काही घडेल, त्याची जबाबदारी पाकिस्तानची असू शकत नाही, असा इशारा दिला होता. पाकिस्तानने तालिबानशी फारकत घेतल्याचे संकेत देणार्‍या पाकिस्तानच्या धोरणात झालेला बदल या देशातील कट्टरपंथियांनाही धक्का देणारा आहे.

तालिबानवर पाकिस्तानचे नियंत्रण राहिलेले नाही. तालिबान आता उत्तम राजकारण करीत असून इतर देशांशी स्वतःहून चर्चा करू लागले आहेत. यात भारताचाही समावेश आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कुवेतला भेट दिली होती व त्याच्या आधी ते कतारमध्ये काही काळासाठी थांबले होते. कतारमध्येच तालिबानचे राजनैतिक कार्यालय आहे, याकडे भारतीय विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. भारत आणि तालिबानमधील ही कथित चर्चा पाकिस्तानला अस्वस्थ करणारी ठरते. यानंतर पाकिस्तानने तालिबानच्या विरोधात भूमिका घेतली असून यातून अफगाणिस्तानचे राजकारण वेगळ्या दिशेने प्रवास करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

तालिबानने भारताशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे संकेत याआधी दिले होते. पुढच्या काळात आपल्या हाती अफगाणिस्तानची सत्ता आली, तर इथे भारतीय गुंतवणूक व प्रकल्पांचे स्वागत होईल, असा संदेश तालिबानकडून दिली जात आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला जाणार नाही, अशी ग्वाही तालिबानने दिली आहे. यामुळेच तालिबान पाकिस्तानपासून दूर गेल्याचे दिसत आहे.

leave a reply