‘अंडरसी केबल’ प्रकल्पात चीनला थारा देऊ नका

- अमेरिकेने ‘पॅसिफिक आयलंड नेशन्स’ना खडसावले

वॉशिंग्टन – पॅसिफिक महासागर क्षेत्रातील ‘अंडरसी इंटरनेट केबल’ प्रकल्पात चिनी कंपन्यांना थारा देऊ नकात, असा खरमरीत इशारा अमेरिकेने संबंधित देशांना दिला. या भागातील तीन ‘आयलंड नेशन्स’ना जोडणार्‍या प्रकल्पासाठी चीनच्या ‘हुवेई मरिन’ या कंपनीने निविदा सादर केली आहे. सदर प्रकल्पात अमेरिकेचा प्रमुख संरक्षणतळ असणार्‍या ‘गुआम’नजिकच्या केबल नेटवर्कचाही वापर होणार असल्याने त्यातील चीनच्या सहभागाला अमेरिकेने कडाडून विरोध दर्शविला आहे. अमेरिकेने ‘आयलंड नेशन्स’ना दिलेल्या इशार्‍यावर चीनकडून तीव्र नाराजी दर्शविली आहे.

पॅसिफिक महासागरातील ‘आयलंड नेशन्स’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘मायक्रोनेशिया’, ‘नाऊरु’ व ‘किरिबाती’ या देशांमध्ये वेगवान इंटरनेट उपलब्ध व्हावे यासाठी ‘ईस्ट मायक्रोनेशियन अंडरसी केबल’ टाकण्यात येणार आहे. सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीच्या या केबल प्रकल्पासाठी ७.२६ कोटी डॉलर्स खर्च येणार असून ‘वर्ल्ड बँक’ व ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’ अर्थसहाय्य पुरविणार आहे. या प्रकल्पासाठी जपान, फ्रान्स, फिनलंड व चीनच्या कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. चीनच्या ‘हुवेई मरिन’ या कंपनीने निविदा सादर करताना इतर कंपन्यांपेक्षा २० टक्के कमी खर्चात प्रकल्प उभारण्याचा दावा केला आहे.

प्रकल्पात टाकण्यात येणारी ‘अंडरसी केबल’ ही यापूर्वी उभारण्यात आलेल्या ‘एचएनएट्य्रु-१’ या केबल नेटवर्कला जोडण्यात येणार आहे. ‘एचएनएट्य्रु-१’ केबलचा वापर अमेरिकेचा पॅसिफिकमधील प्रमुख संरक्षणतळ असणार्‍या ‘गुआम’साठी करण्यात येतो. त्यामुळे गुआमसाठी वापरण्यात येणार्‍या केबल नेटवर्कला चिनी कंपनीचा सहभाग असलेली केबल जोडण्यास अमेरिकेने जोरदार विरोध केला आहे. नव्या केबलच्या माध्यमातून चीन अमेरिकी संरक्षणतळाशी निगडित संवेदनशील माहितीवर डल्ला मारेल, असा दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे.

त्यामुळे ‘ईस्ट मायक्रोनेशियन अंडरसी केबल’ प्रकल्पात चिनी कंपनीला थारा देऊ नकात, असा स्पष्ट इशारा अमेरिकेने दिला आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने यासंदर्भात मायक्रोनेशिया सरकारला ‘डिप्लोमॅटिक नोट’ पाठवून चिनी कंपनीच्या सहभागावर तीव्र आक्षेप नोंदविले होते. अमेरिकेच्या विरोधानंतर प्रकल्पाचा भाग असलेल्या मायक्रोनेशिया व नाऊरु या दोन देशांनी चिनी कंपनीच्या सहभागाबाबत फेरविचार करण्याचे संकेत दिले. मात्र किरिबाती या ‘आयलंड नेशन’ने चिनी कंपनीला झुकते माप देण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने पुन्हा एकदा या देशांना चीनबाबत निक्षून बजावल्याचे उघड झाले आहे.

अमेरिकेपाठोपाठ तैवाननेही पॅसिफिक क्षेत्रातील प्रकल्पात चीनच्या संभाव्य सहभागावर नाराजी व्यक्त केली. ‘अंडरसी केबल नेटवर्क’चा वापर चीन इतर देशांवर हेरगिरी करण्यासाठी तसेच त्यांच्याकडील माहिती चोरण्यासाठी करील, असा आरोप तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. अमेरिकेकडून ‘आयलंड नेशन्स’वर टाकण्यात येणार्‍या दबावावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. अमेरिका जाणुनबुजून चिनी कंपन्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला.

यापूर्वी २०१८ साली चीनने पॅसिफिक महासागर क्षेत्रातील ‘पापुआ न्यू गिनी’ व ‘सॉलोमन आयलंड’ या ‘आयलंड नेशन्स’मध्ये ‘अंडरसी केबल नेटवर्क’ उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने या संपूर्ण प्रकल्पासाठी अर्थसहाय्य पुरवून चीनचे इरादे उधळले होते. ‘ईस्ट मायक्रोनेशियन अंडरसी केबल’ प्रकल्पातही त्याचीच पुनरावृत्ती होण्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply