पाकिस्तानातील तालिबानला दहशतवादी ठरवून आपले शत्रू वाढवू नका

- पाकिस्तानी माध्यमांना ‘तेहरिक’च्या नेत्याची धमकी

शत्रूइस्लामाबाद – ‘‘यापुढे पाकिस्तानच्या माध्यमांनी आणि पत्रकारांनी ‘तेहरिक-ए-तालिबान’चा उल्लेख दहशतवादी व कट्टरपंथिय संघटना असा करू नये. तसे करणे तुमच्या व्यवसायाचा भाग असलेल्या निष्पक्षतेला साजेसे ठरणार नाही. शिवाय यामुळे तुमचे शत्रू वाढतील हे लक्षात घ्या’’, अशी धमकी तेहरिकने दिली आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येत असताना, पाकिस्तानातील तेहरिकच्या घातपाताची तीव्रता वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत तेहरिकने ही धमकी देऊन पाकिस्तानची माध्यमे आणि पत्रकारांचा थरकाप उडविल्याचे दिसते.

तेहरिकचा नेता मोहम्मद खोरासानी याचे पाकिस्तानी वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांना तसेच पत्रकार आणि विश्‍लेषकांना इशारा देणारे पत्र प्रसिद्ध केले. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा आणि तेहरिकमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या बातम्या देताना तेहरिकचा उल्लेख दहशतवादी व कट्टरपंथिय संघटना असा केला जातो, ही चुकीची बाब आहे. कारण या संघर्षात एकाने पक्षाने दुसर्‍याला दिलेली उपाधी त्याच्यावर लादली जाते. त्याचवेळी या पक्षाने स्वतःबद्दल केलेले दावे जसेच्या तसे स्वीकारले जातात, हे खपवून घेता येणार नाही, असे सांगून खोरासानी याने पाकिस्तानी माध्यमे व पत्रकारांनी आपल्या सरकार आणि लष्कराची बाजू घेऊ नये, असे बजावले.

अशारितीने पाकिस्तानच्या सरकार तसेच लष्कराची बाजू घेऊन तुम्ही निष्पक्ष नाहीत, हे सिद्ध करीत आहात, असा ठपका खोरासानी याने पाकिस्तानी माध्यमांवर ठेवला. पण तुमच्या या पक्षपाती वार्तांकनाकडे आम्ही अत्यंत बारकाईने पाहून त्याची नोंद घेत आहोत. यापुढे तेहरिकचा उल्लेख दहशतवादी असा केलात, तर तुम्ही तुमच्या शत्रूंची संख्या वाढवित आहात, हे लक्षात घ्या, असा पाकिस्तानच्या माध्यमांना हादरविणारा इशारा खोरासाने याने या पत्रात दिला. यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे. या पत्राची बातमी प्रसिद्ध होत असतानाच, पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांचे नवे सत्र सुरू झाले आहे. या हल्ल्यांची जबाबदारी तेहरिकने उघडपणे स्वीकारली होती. त्यामुळे माध्यमांना तेहरिकने दिलेल्या या धमकीचे गांभीर्य प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन होऊन यात आपल्या तालावर नाचणार्‍या गटाचे वर्चस्व असावे, यासाठी पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर गेल्या काही आठवड्यांपासून धडपडत होते. पण अफगाणिस्तानातला हा हस्तक्षेप पाकिस्तानच्या मूळावर येईल, अशी चिंता काही पाकिस्तानी पत्रकारांनी व्यक्त केली होती. माजी राजनैतिक अधिकारी देखील इम्रान खान यांच्या सरकारला या विरोधात इशारे देत आहेत.

अफगाणिस्तानात भयंकर रक्तपात घडविणारी तालिबान ही संघटना दहशतवादी नाही, अशी अधिकृत भूमिका पाकिस्तानने स्वीकारली आहे. पाकिस्तानी माध्यमे याच दृष्टीने अफगाणिस्तानकडे पाहत आहेत. मात्र अफगाणिस्तानच्याच तालिबानचा भाग असलेल्या तेहरिक-ए-तालिबानकडे पाकिस्तान दहशतवादी म्हणून पाहतो. हा दुटप्पीपणा यापुढे चालणार नाही, ही खोरासानी याने दिलेली धमकी पाकिस्तानला वास्तवाची जाणीव करून देणारी ठरू शकते.

अफगाणिस्तानातील तालिबान व पाकिस्तानातील तालिबान अर्थात तेहरिक या दोन वेगवेगळ्या संघटना असल्याचे दावे आजवर पाकिस्तानने केले होते. पण अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येत असताना, तेहरिकबरोबरील तालिबानचे संबंध जगजाहीर झाले आहे. तेहरिकच्या नेत्यांना तालिबानने तुरुंगातून मुक्त केले. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची पाकिस्तानने केलेली मागणी तालिबानच्या नेत्यांनी धुडकावून लावली. इतकेच नाही तर पाकिस्तानला भेट देणारा तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने तेहरिकने पाकिस्तानात घडविलेल्या घातपातांचा निषेध नोंदविला नाही, याकडे पाकिस्तानच्या काही पत्रकारांनी लक्ष वेधले.

तरीही पाकिस्तानचे सरकार तालिबानसाठी काम करीत आहे, ही घातक बाब ठरते, असे या पत्रकारांचे म्हणणे आहे. यानंतरही पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये अफगाणिस्तानातील तालिबानचे माजी लष्करी अधिकारी व विश्‍लेषक तालिबानचे जोरदार समर्थन करीत आहेत. अफगाणिस्तानात सरकार स्थापन होईपर्यंत तालिबानला वेळ द्या, त्यानंतर तालिबान तेहरिकचा बंदोबस्त करील, असा विश्‍वास या सर्वांना वाटत आहे. पण तालिबान आपलाच भाग असलेल्या तेहरिकवर कधीही कारवाई करणार नाही, उलट तालिबानच्या अफगाणिस्तानातील सरकारमुळे तेहरिक अधिक मजबूत होईल, असा इशारा पाकिस्तानातील काही बुद्धिमंतांनी दिला आहे.

leave a reply