‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो

- ‘एफडीए’च्या माजी प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन/मॉस्को/लंडन – कोरोनाव्हायरसच्या वेगाने पसरणार्‍या ‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे अमेरिकेतील काही प्रांतांमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक होऊन रुग्णसंख्येचा स्फोट होऊ शकतो, असा गंभीर इशारा वैद्यक तज्ज्ञ व ‘एफडीए’चे माजी प्रमुख डॉक्टर स्कॉट गॉटिलेब यांनी दिला आहे. अमेरिकेत सध्या दिवसाला 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळत असून त्यात वाढ होण्याचे संकेत तज्ज्ञाकडून देण्यात आले आहेत. नव्या ‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे अमेरिकेबरोबरच ब्रिटन, रशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रलिया यासारख्या प्रमुख देशांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याचे समोर येत आहे.

‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो - ‘एफडीए’च्या माजी प्रमुखांचा इशाराजगभरातील विविध देशांमध्ये कोरोनाची दुसरी व तिसरी लाट धडकली असून त्यामागे नवनवे ‘व्हेरिअंट’ कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 18 कोटींवर गेली असून 39 लाखांहून अधिक जण दगावले आहेत. यातील सर्वाधिक बळी अमेरिकेतील असून त्यानंतर ब्राझिलचा समावेश आहे. अमेरिकेत सहा लाखांहून अधिक बळी गेले आहेत. तर ब्राझिलमध्ये कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक जण दगावले आहेत. कोरोनाची साथ रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू असली तरी त्याचवेळी रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेतील ‘एफडीए’चे माजी प्रमुख डॉक्टर गॉटिलेब यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो. ‘अमेरिकेतील काही प्रांतांमध्ये डेल्टा व्हेरिअंटमुळे कोरोनाचा नवा उद्रेक झाल्याचे पहायला मिळेल. यात अर्कान्सास, मिसिसिपी व व्योमिंग यासारख्या प्रांतांचा समावेश असू शकतो. या प्रांतांमध्ये लसीकरणाचा वेग व एकूण प्रमाण कमी असल्याने जास्त धोका आहे’, असे डॉक्टर गॉटिलेब यांनी बजावले. यावेळी त्यांनी ब्रिटनमध्ये वेगाने वाढत असलेल्या रुग्णसंख्येकडे लक्ष वेधून अमेरिकेतील प्रांतांमध्ये रुग्णसंख्येचा स्फोट पहायला मिळेल, असा इशारा दिला.‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो - ‘एफडीए’च्या माजी प्रमुखांचा इशारा

ब्रिटनमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोमवारी ब्रिटनमध्ये 22 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यातील 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण ‘डेल्टा व्हेरिअंट’चे असल्याचे आढळले आहे. ब्रिटनबरोबरच रशियामध्येही कोरोनाचे रुग्ण व दगावणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी रशियात 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून 652 जणांचा बळी गेला आहे. 24 तासात इतके बळी जाण्याची रशियातील ही पहिलीच वेळ असल्याचे स्थानिक यंत्रणांकडून सांगण्यात आले. आग्नेय आशियातील इंडोनेशियामध्येही कोरोना साथीचा उद्रेक झाल्याचे समोर आल आहे. सोमवारी देशात 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून 423 जणांचा बळी गेला आहे. इंडोनेशियाची आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या स्थितीत असून देश भयावह संकटाच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा ‘रेड क्रॉस’ने दिला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली असून गेल्या 48 तासांमध्ये चार प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यात मेलबर्न, सिडनी, पर्थ व डार्विन या शहरांचा समावेश आहे.

leave a reply