‘डीआरडीओ’कडून ‘अग्नी-पी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली- ‘डीआरडीओ’ने ‘अग्नी-पी’ या प्रगत क्षेपणास्त्राची सोमवारी ओडिशाच्या तळावर यशस्वी चाचणी घेतली. या ‘अग्नी-पी’ ची मारक क्षमता 1000 ते 2000 किलोमीटर इतकी आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांंनी या यशासाठी डीआरडीओचे अभिनंदन केले. या प्रगत क्षेपणास्त्रामुळे भारताचे सामर्थ्य वाढले आहे, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘डीआरडीओ’कडून ‘अग्नी-पी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीसोमवारी ’डीआरडीओ’ने ओडिशाच्या डॉ. अब्दुल कलाम बेटावरुन सकाळच्या सुमारास ‘अग्नी-पी’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली. या क्षेपणास्त्राने सर्व निकष पूर्ण केल्याचे ‘डीआरडीओ’ने म्हटले आहे. क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचा माग घेण्यासाठी पूर्व किनारपट्टीवर विविध प्रकारची स्वयंचलित दूरप्रक्षेपण तसेच रडार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.

‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या ’अग्नी-पी’चे वजन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘अग्नी-3’पेक्षा 50 टक्क्याने कमी आहे. त्यामुळे याची वाहतूक रस्ते किंवा रेल्वेद्वारेही करता येऊ शकते, असे सांगितले जाते. ‘अग्नी-पी’च्या टप्प्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्र येत असल्यामुळे सामरिकदृष्ट्या या क्षेपणास्त्राचे महत्त्व वाढले आहे.

इंडो पॅसिफिक क्षेत्रातील युद्धनौका व विनाशिकांचा या क्षेपणास्त्राद्वारे वेध घेणे अतिशय सोपे जाऊ शकते. त्यामुळे या सागरी क्षेत्रात वावर वाढविणार्‍या चीनला यातून योग्य तो संदेश मिळू शकतो. भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम चीनच्या खूपच मागे असल्याचे दावे चीनची सरकारी माध्यमे करीत आली आहे. मात्र भारताच्या क्षेपणास्त्रनिर्मितीचा वेग गेल्या काही वर्षात वाढला असून याकडे दुर्लक्ष करणे चीनसाठी अवघड बनले आहे.

leave a reply