इराकमध्ये अमेरिकी उच्चायुक्तालय, लष्करी पथकावर हल्ले

बगदाद – गेल्या काही चोवीस तासात इराकमधील अमेरिकेच्या हितसंबंध दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष्य ठरले. इराकच्या इरबिल शहरातील अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाजवळ तीन ड्रोन्सचे हल्ले झाले. तर शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे इराकच्या चार भागांमध्ये अमेरिकेच्या लष्करी पथकांना लक्ष्य केल्याची माहिती इराणी वृत्तसंस्थेने दिली. अफगाणिस्तानप्रमाणे अमेरिकेने इराकमधूनही सैन्यमाघार घ्यावी, अन्याथा परिणामांना तयार रहावे, अशी धमकी देणार्‍या इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनेवर या हल्ल्यांसाठी संशय व्यक्त केला जातो. इराकमध्ये अमेरिकेचे अडीच हजार जवान तैनात आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये इराकमधील अमेरिकेच्या हितसंबंधांवर 43 हल्ले झाले आहेत.

अमेरिकी उच्चायुक्तालयइराकमधील स्वायत्त कुर्दिस्तान प्रांताची राजधानी इरबिलमधील अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाच्या इमारतीजवळ शनिवारी उशीरा तीन ड्रोन्सचे हल्ले झाले. यापैकी दोन ड्रोन्स जवळच्या घरावर कोसळले. तर तिसर्‍या ड्रोन्सचा स्फोट झाला नाही. या हल्ल्यांमध्ये कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाने या हल्ल्यांवर जोरदार टीका केली. हे हल्ले म्हणजे इराकच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

या हल्ल्यांना काही तास उलटत नाही तोच शनिवार रात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत अमेरिकेच्या लष्करी पथकावर हल्ले झाल्याचे वृत्त आहे. राजधानी बगदादसह, हिलाह, अल दिवानियाह आणि सलादीन या भागात गस्तीवर असलेल्या अमेरिकेच्या लष्करी वाहनांना लक्ष्य करण्यात आले. या चारही हल्ल्यांमध्ये कुठलीही हानी झाली नसल्याचे वृत्त इराणी वृत्तसंस्थेने दिले. गेल्या चोवीस तासात झालेल्या या हल्ल्यांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण इराकमधील इराणसंलग्न हाशेद अल-शाबी अर्थात पाप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस-पीएमएफ यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

अमेरिकी उच्चायुक्तालयशनिवारी पीएमएफने राजधानी बगदादमध्ये सशस्त्र संचलनाद्वारे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी इराणसंलग्न पीएमएफने अमेरिकेच्या पूर्ण सैन्यमाघारीच्या घोषणा दिल्या. इराक आणि सिरियातील आयएस या दहशतवादी संघटनेविरोधात संघर्ष करण्यासाठी इराणने उभारलेल्या सशस्त्र संघटनांपैकी पीएमएफ ही एक आहे. मात्र इराक व सिरियातील अमेरिकेच्या तसेच इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगून अमेरिकेने ही दहशतवादी संघटना असल्याचे घोषित केले आहे.

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत इराकमधील अमेरिकेच्या हितसंबंधांवर 43 हल्ले झाले आहेत. यामध्ये बगदाद तसेच अल-असाद येथील लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. तर एप्रिल महिन्यात इरबिल येथील लष्करी तळावर ड्रोन हल्ले झाले होते. गेल्या वर्षी अमेरिकेने बगदाद येथील ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुर्द्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी आणि अबू महदी अल-मुहानदीस यांची हत्या घडविल्यानंतर इराकमधील अमेरिकेच्या हितसंबंधांवरील हल्ले वाढले आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन हल्ले झाले होते. यातील एका हल्ल्यात अमेरिकेचे दोन कंत्राटदार जखमी झाले होते. अमेरिकेने या प्रकरणी प्रतिक्रीया देण्याचे टाळले होते. पण या हल्ल्यांची माहिती देणार्‍यास अमेरिकेने 30 लाख डालर्सचे इनाम जाहीर केले होते.

leave a reply