जम्मूमधील वायुसेनेच्या तळावरील स्फोट हा दहशतवादी हल्लाच – वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांचा सज्जड इशारा

नवी दिल्ली – वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी वायुसेनेच्या तळावरील घातपात म्हणजे दहशतवादी कारवाई असल्याचा ठपका ठेवून यामागे वायुसेनेची हानी घडवून आणण्याचा कट होता, असा आरोप केला आहे. पाकिस्तानने सुरू केलेल्या या ‘ड्रोन युद्धाकडे’ भारत अत्यंत संवेदनशीलतेने पाहत आहे, याची जाणीव वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी याद्वारे करून दिली. जम्मूमधील या तळावर वायुसेनेची हानी घडविण्याच्या हेतूने हा घातपात घडविण्यात आला. त्याला यश मिळाले नाही, पण हा घातपात म्हणजे दहशतवादी हल्लाच ठरतो, असे वायुसेनाप्रमुख म्हणाले. याचा तपास केला जात असून अशा स्वरुपाच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अधिक क्षमता प्राप्त करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत, असे वायुसेनाप्रमुख भदौरिया पुढे म्हणाले.

दरम्यान, जम्मू व काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी वायुसेनेच्या तळावरील स्फोटामागे पाकिस्तानातील ‘लश्कर-ए-तोयबा’ व ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटना असू शकतात, असे म्हटले आहे. याआधी ‘लश्कर’ व ‘जैश’ने जम्मू व काश्मीरमध्ये ड्रोन्सचा वापर करून शस्त्रे, स्फोटके व अमली पदार्थ पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता, याकडे लक्ष वेधून दिलबाग सिंग यांनी हा आरोप केला आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी एकाच दिवसापूर्वी जम्मूमधील या स्फोटामागे पाकिस्तान असण्याची दाट शक्यता व्यक्त केली होती. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांनी जम्मू येथील या स्फोटाशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचा दावा केला होता. कोरोनाची साथ रोखण्यात भारताला आलेल्या अपयशाकडून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी भारत पाकिस्तानवर असे आरोप करीत असल्याचे शेख रशिद यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी ड्रोन्सच्या भारतीय उच्चायुक्तालयावर घिरट्या – भारताने गंभीर दखल घेऊन निषेध नोंदविला

जम्मू येथील वायुसेनेच्या तळावर झालेल्या घातपातानंतर, भारताच्या विरोधात पाकिस्तानने छेडलेल्या ड्रोन युद्धाचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारताच्या उच्चायुक्तालयावर ड्रोन वावरत असल्याचे समोर आले होते. भारताने याची गंभीर दखलघेतली असून परराष्ट्र मंत्रालयाने याचा निषेध नोंदविला आहे. तर पाकिस्तानने भारताच्या या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगून ही बाब उडवून लावली आहे.

गेल्या आठवड्यात इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयावर पाकिस्तानचे ड्रोन वावरत होते. भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही घातक बाब ठरते, याकडे लक्ष वेधून भारताने हे प्रकरण पाकिस्तानकडे उपस्थित केले. याचा निषेध नोंदवून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने याचा तपास करावा, अशी मागणी केली आहे. मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारताचा आरोप म्हणजे अपप्रचाराचा भाग असल्याचा दावा केला.

भारताच्या या आरोपाबाबतचे पुरावे नसल्याचे सांगून पाकिस्तानच्या प्रवक्त्याने यात तथ्य नसल्याचा दावा केला. पाकिस्तानच्या राजधानीतील भारतीय उच्चायुक्तालयावरील ड्रोन्सच्या वावराचे पुरावे पाकिस्तान भारताकडे मागत आहे, ही हास्यास्पद बाब ठरत आहे.

 

leave a reply