राजौरीमध्ये टेहळणी करणारे ड्रोन पकडले

- दोन तरुणांना अटक

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये सुरक्षा ठिकाणांची टेहळणी करणारे ड्रोन जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या ड्रोनद्वारे व्हिडिओग्राफीही करता येणे शक्य आहे. या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजौरीमधील गुर्जर मंडीमध्ये तैनात असलेल्या पोलिस गस्ती पथकाला रात्री डीसी ऑफिस रोडवर आकाशात प्रकाश दिसला. त्यानंतर हे पथक सतर्क झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात अधिक पथके तैनात करण्यात आली व ड्रोनचा शोध घेण्यास सुरवात आली मात्र काही वेळात हा ड्रोन दिसेनासा झाला.

मात्र ड्रोनद्वारे सुरक्षा ठिकाणांची टेहळणी करण्यात येत असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या ड्रोनचा कसून शोध घेण्यास सुरवात करण्यात आली.

अखेर हे ड्रोन कोणत्या भागातून हाताळण्यात येत होते याचा शोध घेण्यात यश आले. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे . संवेदनशील भागात ड्रोनचा वापरत करण्यास बंदी असताना या भागात ड्रोनचा वापर करण्यात येत असल्याने त्यांची कसुन चौकशी करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेले ड्रोन व्हिडीओग्राफी करण्यास सक्षम असल्याने सुरक्षायंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. ड्रोनचा वापर नक्की काशासाठी करण्यात येत होता. आतापर्यंत कोणत्या भागाची व्हिडीओग्राफी करण्यात आली या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.

राजौरीमध्ये सापडलेला ड्रोन हा व्हिडीओग्राफीसाठी उपयुक्त आहे. मात्र या पूर्वी या भागात पकडण्यात आलेले ड्रोन शस्त्र तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी ९ ते १६ सप्टेंबरमध्ये अमृतसर आणि तरनतारण जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईत 80 किलो दारूगोळा जप्त करण्यात आला होता. हा शस्त्रसाठा ड्रोनच्या सहाय्याने पाठविण्यात आला होता.

सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या तळावर मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु असून घूसखोरीसाठी दहशतवाद्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनाव्हायरसच्या संकटात देखील दहशतवाद्याच्या कुरापती सुरूच आहेत. कोरोनाव्हायरसपासून जवानांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असतानाच सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्याकडे लष्कर पूर्णपणे सतर्क असल्याचे नुकतेच लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले होते.

leave a reply