जम्मू-काश्मीरमध्ये ‘ड्रोन ग्रीड’द्वारे हवाई पाळत

  • जम्मू-काश्मीरमधील २६ दहशतवाद्यांना आग्य्रातील कारागृहात हलविले
  • पुंछमध्ये दोन आयईडी निकामी
  • एनआयएच्या धाडीमध्ये आठ जणांना अटक

‘ड्रोन ग्रीड’

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुंछमधील जंगलात सुरू असलेल्या ऑपरेशनचा शुक्रवारी १२ वा दिवस होता. या ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी जंगलात पेरून ठेवलेले दोन आयईडी सुरक्षादलांनी निकामी केले. दहशतवाद्यांना घेरण्यात आले असून दहशतवादी जंगलातून निसटू नयेत यासाठी सुरक्षादलांच्या जवानांची तैनातीही वाढविण्यात आली आहे. तसेच दहशतवाद्यांकडून निष्पाप नागरिकांच्या हत्यांचे सुरू झालेले सत्र पाहता स्थलांतरीत मजूर, तसेच काश्मिरी पंडित राहत असलेल्या भागात हवाई पाळत ठेवण्यात येणार आहे. यासाठी ड्रोन ग्रीड उभारण्यात येणार आहे, अशी माहिती सुरक्षादलाच्या अधिकार्‍याने दिली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांकडून स्थानिक आणि स्थलांतरीत मजूरांच्या हत्या सत्रानंतर दहशतवाद्यांवर सर्वबाजूने कारवाई सुरू झाली आहे. त्याचवेळी नागरिकांच्या संरक्षणासाठीही पावले उचलले जात आहेत. १९९० च्या दशकांप्रमाणे काश्मीर खोर्‍यात राहणार्‍या काश्मिरी पंडितांमध्ये, तसेच येथील इतर अल्पसंख्यांकामध्ये दहशत माजवून त्यांना पलयानास भाग पाडण्याची पाकिस्तान व पाकिस्तान पुरुस्कृत दहशतवादी संघटनांची योजना आहे. या पार्श्‍वभूमीवर काश्मिरी पंडितांमध्ये भयमूक्त वातावरण निर्माण व्हावे, त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षादलांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर सुरक्षादलांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांची एक उच्चस्तरीय चर्चा पार पडली. यामध्ये काश्मिरी पंडित, इतर स्थानिक अल्पसंख्यांक व तसेच स्थलांतरीत मजूरांच्या सुरक्षेबाबत विविध उपायांवर विचार करण्यात आला. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी यावेळी ड्रोन ग्रीडचा उपाय सुचविल्याची माहिती सीआरपीएफचे उपमहानिरिक्षक मॅथ्यू जॉन यांनी दिली आहे. ड्रोन ग्रीड म्हणजे अनेक ड्रोनचे जाळे ज्याद्वारे दहशतवाद्यांकडून हल्ल्याची भीती असलेल्या भागात हवाई पाळत ठेवली जाईल. तसेच या भागाचा लाईव्ह व्हिडीओ कन्ट्रोल रुममध्ये पाहता येईल. यामुळे संशयीत कारवाया पकडता येतील व तबतोब कारवाई हाती घेता येईल. यानुसार काश्मिरी पंडित, सिख बांधव व स्थलांतरीत मजूर रहात असलेल्या अशा १५ ठिकाणांची ओळख पटवून या ठिकाणी हवाई पाळत सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या ताफ्यातील ड्रोनला यासाठी तैनात करण्यात आल्याच्या बातम्या आहेत.

‘ड्रोन ग्रीड’तर दुसरीकडे एनआयएही दहशतवाद्यांवर त्यांच्या पाठिकाराख्यांवर कारवाई करीत आहे. गेल्या काही दिवसात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ५० हून अधिक ठिकणी छापे टाकले आहेत. तसेच सुमारे हजार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारीही १० ठिकाणी एनआयएने धाडी टाकल्या. श्रीनगर, कुलगाम, शोपियान, पुलवामा, अनंतनाग आणि बारामुल्लामध्ये हे छापे टाकण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर बंदी असलेले साहित्य व पोस्टर्ससह काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत. एनआयएने ८ जणांना अटक केली आहे. त्यामुळे १० ऑक्टोबरपासून आतापर्यंत एनाआयएने अटक केलेल्यांची संख्या २१ वर गेली आहे.

दुसर्‍या बाजूला जम्मू-काश्मीरमधील कारागृहात बंद असलेल्या दहशतवाद्यांना इतर राज्यातील केंद्रीय कारागृहात हलविले जात आहे. २६ दहशतवाद्यांना आग्र्या येथील कारगृहात हलविण्याची तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. हे दहशतवादी स्लीपर सेलच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. तसेच ते कारागृहात फरार होण्याचीही शक्यता वाढली होती. आणखी १०० दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

leave a reply