कोरोनामुळे उद्भवलेले आर्थिक संकट जागतिक महामंदीसारखे

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

आर्थिक संकटमॉस्को – ‘मानवजातीला 2020 सालात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले असून त्याची तीव्रता अभूतपूर्व आहे. कोरोनाव्हायरसची साथ, जागतिक स्तरावरील लॉकडाऊन व त्यामुळे थंडावलेले आर्थिक व्यवहार यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. गेल्या शतकातील जागतिक महामंदीनंतर आंतरराष्ट्रीय समुदायावर अशा संकटाचा मुकाबला करण्याची वेळ आली नव्हती. कोरोनाच्या साथीमुळे लाखो जणांचा मृत्यू झाला असून असून कोट्यवधी लोकांवर रोजगार गमावण्याची वेळ आली’, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे.

शनिवारी सुरू झालेल्या ‘जी20 समिट’ला संबोधित करताना रशियन राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाची साथ, त्यामुळे बसलेला फटका व साथीविरोधात सुरू असलेले प्रयत्न या मुद्यांवर भर दिला. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर बेरोजगारी व गरीबीचे आव्हान अद्यापही कायम असून त्यावर मात करण्यासाठी ‘जी20’चे योगदान महत्त्वाचे राहिल, असा दावा पुतिन यांनी केला. यावेळी त्यांनी ‘जी20’ गटाने संयुक्त राष्ट्रसंघ, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक यासारख्या यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांचाही उल्लेख केला.

‘कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे अनेक विकसनशील देश व उगवत्या अर्थव्यवस्थामध्ये योग्य उपाययोजना करण्याची क्षमता राहलेली नाही. चलनाचे अवमूल्यन व कर्जाचे वाढते बोजे मोठे आव्हान म्हणून समोर येत आहे. छोट्या देशांवरील बहुतांश कर्ज अमेरिकी डॉलर्सच्या स्वरुपात आहे. जी20 सह इतर यंत्रणांनी सहाय्य पुरविले असले तरी अधिक मदतीची गरज आहे. तसे घडले नाही तर या देशांमधील आर्थिक व सामाजिक विषमता अधिकच वाढीस लागेल’, असा इशारा रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिला. यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आर्थिक पातळीवर केलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या योजनांमुळे अमेरिकी अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास सहाय्य झाले असून त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थाही सुधारण्यास मदत होत आहे, असे पुतिन म्हणाले. साथीचा मुकाबला करण्यासाठी जगभरात लस शोधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करीत जगातील प्रत्येकाला लस उपलब्ध व्हायला हवी, असे आवाहन रशियन राष्ट्राध्यक्षांनी केले. त्याचवेळी रशियाने पहिली लस बनविल्याचे सांगून अजून दोन लसी वेगवेगळ्या टप्प्यात आहेत व जगातील इतर देशांना लस पुरविण्यास रशिया तयार आहे, अशी ग्वाहीदेखील राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली.

दरम्यान, कोरोना साथीच्या मुद्यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांनी केलेल्या वक्तव्याने प्रसारमाध्यमे व सोशल मीडियात जोरदार खळबळ उडवली आहे. पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांनी यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत कोरोनाची साथ ही जगाला ‘रिसेट’ करण्याची संधी आहे, असा दावा केला होता. हे विधान जागतिक कारस्थानाचा भाग असल्याचा आरोप कॅनडातील विरोधी पक्ष, माध्यमे तसेच सोशल मीडियातून करण्यात आला आहे. पंतप्रधान ट्य्रुड्यू यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

leave a reply