कोरोनाचे संकट मागे टाकून अर्थव्यवस्था गती पकडत आहे

- पंतप्रधान मोदी यांचा विश्‍वास

नवी दिल्ली – ‘कोरोनाचे संकट असताना देखील देशात मोठ्या धाडसाने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविण्यात आला. ह्या सुधारणा कुणाच्या सक्तीने नाही, तर आपल्या दृढविश्‍वासानेच सरकार करीत आहे. देशहित डोळ्यासमोर ठेवून सरकार हे धाडसी निर्णय घेण्याची जोखीम पत्करत आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. उद्योगक्षेत्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी या सुधारणांबरोबरच देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे, असे सांगून त्यावर समाधान व्यक्त केले. देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली असून देशाची परकीय गंगाजळी आत्तापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

कोरोनाचे संकट मागे टाकून अर्थव्यवस्था गती पकडत आहे - पंतप्रधान मोदी यांचा विश्‍वास‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री-सीआयआय’च्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. आपल्या देशात एकेकाळी परदेशी उत्पादने सर्वोत्तम असल्याचे मानले जात होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. भारतीय बॅॅ्रण्डस्ना असेलली मागणी वाढत चालली आहे, हे फार मोठे सुचिन्ह ठरते, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. देशाच्या प्रगतीसाठी उद्योगक्षेत्राला फार मोठे महत्त्व आहे. आत्ताच्या काळात देशाच्या आर्थिक विकासासाठी सरकार व उद्योगक्षेत्र परस्परांना सहकार्य करीत आहे, याने आर्थिक विकासाला चालना मिळत आहे, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

आयटी क्षेत्रातील रोजगारनिर्मितीला चालना मिळाली असून डिजिटायझेशनमुळे देशातील मागणी वाढते आहे. देशात येणारी थेट परकीय गुंतवणूक विक्रमी स्तरावर आहे. सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे हे परिणाम समोर येत आहेत. यामध्ये करविषयक सुधारणांचा फार मोठा वाटा आहे. भारताची आत्ताची करपद्धती स्पर्धात्मक बनलेली आहे, असा दावा पंतप्रधानांनी केला. एकेकाळी परकीय गुंतवणुकीकडे संशयाने पाहणारा भारत आता आत्मविश्‍वासाने सर्वच क्षेत्रात गुंतवणुकीचे स्वागत करीत आहे. आत्तापर्यंत धोरणात्मक महत्त्व असलेल्या क्षेत्रात खाजगी कंपन्यांना काम करण्याची संधी दिली जात नव्हती. पण आता आपल्या उद्योगक्षेत्रावर विश्‍वास दाखवून भारत संरक्षण व अंतराळ या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रातही खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

याबरोबरच अलिकडच्या काळात नव्या उद्योगासाठी घेतला जाणारा पुढाकार ही फार मोठी आशादायी बाब ठरते, असे सांगून पंतप्रधानांनी याचे स्वागत केले. याबरोबरच उद्योगक्षेत्राने आता अधिक जोखीम पत्करण्याची तयारी ठेवून आत्मविश्‍वासाने निर्णय घ्यावे, असा संदेश पंतप्रधानांनी दिला. जुलै महिन्यातील जीएसटीचा महसूल १.१६ लाख कोटी इतका होता. याचा दाखला देऊन देशाची अर्थव्यवस्था गती पकडत असल्याचा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर नवी आव्हाने उभी राहिलेली असली, तरी हे संकट सरल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मोठी झेप घेईल, असा विश्‍वास अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. घटलेली मागणी ही देशाच्या अर्थकारणातील सर्वात मोठी समस्या मानली जात होती. पण आता मागणी पूर्वपदावर येत असून त्याचे सुपरिणाम दिसू लागले आहेत. पंतप्रधानांनी ‘सीआयआय’ला संबोधित करताना याचा दाखला देऊन उद्योगक्षेत्राचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

leave a reply