बायडेन यांनी ‘अमेरिका-युरोप’मध्ये विष पसरविणारा व्यापारी संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्न करावे

- फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांचे आवाहन

वॉशिंग्टन/पॅरिस – अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिका व युरोपमधील संबंधांमध्ये विष पसरविणारा व्यापारी संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-य्वेस ले ड्रियन यांनी केले आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस ट्रम्प प्रशासनाने युरोपमधून आयात होणार्‍या उत्पादनांवर कर लादत असल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ काही दिवसांपूर्वी युरोपिय महासंघ व चीनदरम्यान झालेल्या ‘इन्व्हेस्टमेंट ट्रिटी’वर बायडेन यांच्या निकटवर्तियांकडून नाराजीची प्रतिक्रिया उमटली होती. या पार्श्‍वभूमीवर फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी केलेले आवाहन लक्ष वेधून घेणारे ठरते.

‘पोलाद, डिजिटल तंत्रज्ञान, एअरबस व वाईनवर लादलेले कर आणि त्याच्या वाढत्या किंमती यामुळे युरोप व अमेरिकेमधील संबंधांमध्ये विष कालवले जात आहे. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युरोपिय महासंघाशी संवाद साधून हा व्यापारी वाद थांबविण्यासाठी पर्याय शोधायला हवेत. जर व्यापारी संघर्ष रोखण्यासाठी अमेरिकेसह युरोप व फ्रान्सला यश मिळाले तर द्विपक्षीय संबंध पुढे जाण्यास सहाय्य होईल. यासाठी कदाचित खूप वेळ लागू शकतो, पण तोपर्यंतच्या काळात वादाला तात्पुरती स्थगिती देण्याचा पर्याय वापरता येईल’, असे आवाहन फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-य्वेस ले ड्रियन यांनी केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर युरोपिय देशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. नाटोतील युरोपिय देशांचे योगदान आणि चीनबाबतचे धोरण यावरून ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अमेरिका व युरोपमधील व्यापारात अमेरिकेचे प्रचंड नुकसान होत असल्याचा दावा करून, ट्रम्प यांनी युरोपला धोरणे बदलण्याचा इशारा दिला होता. मात्र युरोपने ट्रम्प यांना संघर्ष टाळण्याचा सल्ला दिला होता. युरोपच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून अमेरिकेने उघड व्यापारयुद्धाची भूमिका घेऊन युरोपिय उत्पादनांवर कर लादले होते.

बराक ओबामा राष्ट्राध्यक्षपदी असताना उपराष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या ज्यो बायडेन यांनी युरोपबरोबर सहकार्याची भूमिका घेतली होती. दोन वर्षांपूर्वी युरोपमध्ये झालेल्या एका बैठकीतही बायडेन यांनी युरोपिय देशांना, अमेरिकेबरोबरील संबंधांच्या मुद्यावर चिंता न करण्याचा सल्ला दिला होता. बायडेन यांच्या प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारीही युरोपबरोबर संबंध पूर्ववत करण्यासाठी अनुकूल असल्याचे समोर आले असून ही युरोपासाठी दिलासा देणारीबाब ठरते.

मात्र त्याचवेळी चीनबरोबरील संबंधांचा मुद्दा अमेरिका व युरोपमध्ये तणाव निर्माण ठरु शकतो, असे मानले जाते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने चीनविरोधात आक्रमक राजनैतिक संघर्ष छेडला होता. बायडेन यांच्या कारकिर्दीत यातील आक्रमकता कमी होण्याचे संकेत असले तरी राजनैतिक संघर्ष कायम राहणार आहे. बायडेन यांनी स्वतः चीनच्या कारवायांविरोधात एकत्रित आघाडीची गरज असल्याचे म्हंटले आहे. यात युरोपिय देशांचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे.

पण चीनबरोबरील गुंतवणूक करारामुळे युरोपच्या सहभागावर सवाल उभे राहिले असून ही बाब अमेरिका व युरोपमधील तणाव चिघळवणारी ठरु शकते. या पार्श्‍वभूमीवर, फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांचे विधान लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply