हौथींनी सौदीच्या आभा एअरपोर्टवर केलेल्या हल्ल्यात आठ जण जखमी

- 24 तासातील दुसरा हल्ला असल्याचा दावा

रियाध – हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या आभा विमानतळावर चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात आठ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एका प्रवासी विमानाचेही नुकसान झाल्याची माहिती सौदी यंत्रणांनी दिली. या हल्ल्यापूर्वी नजरन विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न उधळल्याचे सांगण्यात आले आहे. इराणचे समर्थन असलेल्या हौथी बंडखोरांकडून गेल्या काही वर्षात सातत्याने सौदीतील विमानतळ तसेच लष्करी तळांना ड्रोन्सने लक्ष्य करण्यात येत आहे.

मंगळवारी सकाळी येमेन सीमेला जोडून असलेल्या सौदीतील असिर प्रांताची राजधानी असणाऱ्या आभाला लक्ष्य करण्यात आले. सौदी यंत्रणांनी तैनात केलेल्या ‘इंटरसेप्टर सिस्टिम’ने विमानतळावर पाठविण्यात आलेले ड्रोन पाडण्यात यश मिळविले. मात्र ड्रोन्सचे काही तुकडे जवळ असलेल्या प्रवासी विमानात तसेच काही गाड्यांमध्ये घुसले. यावेळी विमानतळावर असलेले काही परदेशी प्रवासी जखमी झाल्याची माहिती सौदी यंत्रणांनी दिली. या प्रवाशांमध्ये भारत, नेपाळ व बांगलादेशच्या प्रवाशांचा समावेश असून बांगलादेशचा एक प्रवासी गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या 24 तासात आभा विमानतळाला ड्रोन्सच्या सहाय्याने लक्ष्य करण्याचा हा दुसरा प्रयत्न असल्याचे सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले. आभा विमानतळावरील हल्ल्यापूर्वी नजरन, जझान व खमिस मुशायत या शहरांना हौथी बंडखोरांनी क्षेपणास्त्र तसेच ड्रोन्सच्या सहाय्याने लक्ष्य करण्याचे प्रयत्न केल्याचे सौदीकडून सांगण्यात आले. मात्र हे सर्व हल्ले निष्फळ ठरविण्यात यश मिळविल्याची माहिती सौदीकडून देण्यात आली.

गेल्या पाच वर्षात हौथी बंडखोरांकडून सातत्याने आभा विमानतळाला लक्ष्य करण्यात येत आहे. सौदी यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, आभा विमानतळावर जवळपास 10 हल्ले झाले असून त्यात क्षेपणास्त्र व ड्रोनहल्ल्यांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये एका परदेशी नागरिकाचा बळी गेला असून 50हून अधिक जण जखमी झाले आहेत.

रविवारी हौथी बंडखोरांनी येमेनमधील सौदी समर्थक फौजांच्या लष्करी तळावर मोठा हल्ला चढविला होता. लहिज प्रांतातील अल-अनद लष्करी तळावर चढविलेल्या हल्ल्यात 30हून अधिक सैनिकांचा बळी गेला होता, तर 60हून अधिक जखमी झाले होते. या हल्ल्यासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह ‘आर्म्डड् ड्रोन्स’चा वापर करण्यात आला होता. या वर्षात हौथी बंडखोरांनी सौदी समर्थक आघाडीवर चढविलेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जातो.

सौदी व मित्रदेश आणि इराणसमर्थक हौथी बंडखोर यांच्यात 2014 सालापासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षात सौदीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागल्याचे सांगण्यात येते. मात्र तरीही सौदीने अद्याप या संघर्षातून माघार घेतलेली नाही. काही महिन्यांपूर्वी सौदीने संयुक्त राष्ट्रसंघ व अमेरिकेच्या मध्यस्थीने हौथी बंडखोरांना शांतीचर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र हौथी बंडखोरांनी त्याला नकार देत संघर्ष अधिक तीव्र करण्याची धमकी दिली आहे.

leave a reply