‘फेम-2’मधील सुधारणेनंतर ई-दुचाकींच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता

नवी दिल्ली – केंद्र सरकारने ईलेक्ट्रीक-टू व्हिलर अर्थात ई-दुचाकींच्या खरेदीला आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘फेम-2’ योजनेत सुधारणा केल्या आहेत. यानुसार ‘फेम-2’ योजनेअंतर्गत ई-दुचाकींच्या खरेदीवर देण्यात येणारी सबसिडी वाढली आहे. त्यामुळे या दुचाकींच्या किंमती कमी होतील. सध्या वापरात असलेल्या पारंपरिक दुचाकींच्या तुलनेत ई-दुचाकी वाहनांच्या किंमती जास्त आहेत. पण ‘फेम-2’मधील सुधारणांमुळे पारंपरिक दुचाकी आणि ई-दुचाकींच्या किंमतींमध्ये असलेली तफावत कमी होईल. त्यामुळे या दुचाकींची खरेदी वाढेल, असा दावा केला जातो. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असताना सरकारने ‘फेम-2’ योजनेत केलेले बदल लक्षवेधी ठरत आहेत.

‘फेम-2’देशात कित्येक ठिकाणी स्थानिक करानुसार पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन तेलाच्या किंमती 71 डॉलर्स प्रती बॅरलपर्यंत पोहोचल्या असून या किंमती 100 डॉलर्सच्याही पुढे जातील, अशी शक्यता विश्‍लेषक व्यक्त करीत आहे. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी उसळी दिसण्याची शक्यता आहे. भारताला पेट्रोल व डिझेल मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागत असून या आयात इंधनावरील निर्भरता कमी करण्यासाठी भारत ई-वाहनांना प्रोत्साहन देत आहे. याअंतर्गत ई-वाहन खरेदीवर सवलत देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे.

देशात ई-वाहनांची खरेदी वाढत असली, तरी अद्याप याला पाहिजे तसा प्रतिसाद वाढलेला नाही. चार्जिंग स्टेशनच्या कमतरतेबरोबर पेट्रोलवर चालणार्‍या वाहनांच्या आणि ई-वाहनांच्या किंमतीतील तफावत हे सुद्धा मुख्य कारण आहे. ‘फेम-2’अंतर्गत ई-दुचाकींच्या खरेदीवर देण्यात आलेल्या सवलतीत वाढ करून सरकारने ही तफावत आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारने ‘फेम-2’ योजनेनुसार देण्यात येणारी ई-दुचाकींवरील सबसिडी 50 टक्क्यांनी वाढविली आहे. यानुसार 1 किलोवॅटची बॅटरी असलेल्या ई-दुचाकींची सबसिडी 10 हजारावरून 15 हजार करण्यात आली आहे. थोडक्यात प्रति किलोवॅट बॅटरी क्षमतेमागे मिळणारी सबसिडी 5 हजाराने वाढली आहे. यानुसार दोन किलोवॅट बॅटरी क्षमतेच्या दुचाकींवर तीस हजाराची आणि तीन किलोवॅटची बॅटरी क्षमता असलेल्या ई-दुचाकी खरेदी करताना 45 हजारांची सवलत मिळेल. अर्थात ग्राहकांसाठी या ई-दुचाकी इतक्या रुपयांनी स्वस्त होतील. मात्र प्रत्येक ई-दुचाकींवर या सबसिडीचा लाभ मिळणार नाही. कारण सरकारने काही मानक ठरविले आहेत, या मानकामध्ये बसणार्‍या दुचाकींनाच ही सबसिडी मिळेल. ‘फेम-2’ योजनेनुसार सबसिडी मिळविण्यासाठी ईलेक्ट्रीक स्कूटर एकवेळ चार्ज केल्यावर कमीत कमी 80 किलोमीटरचे मायलेज देणारी असावी. तसेच या दुचाकीचा सर्वाधिक वेग 40 किलोमीटर प्रति तास असावा.

आयसीआयए या मानांकन संस्थेनुसार सबसिडीमध्ये वाढ केल्याने ई-दुचाकींच्या किंमती 10 ते 12 टक्क्यांनी कमी होतील.

leave a reply