इथिओपियाच्या तिगरे प्रांतात इरिट्रिआचे सैन्य घुसले आहे

- अमेरिका व युरोपिय महासंघाचा इशारा

आदिस अबाबा/अस्मारा – इथिओपियाच्या संघर्षग्रस्त तिगरे प्रांतात पुन्हा एकदा इरिट्रिआचे सैन्य घुसल्याचा इशारा अमेरिका व युरोपिय महासंघाने दिला आहे. तिगरेमध्ये गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. जून महिन्यात तिगरेतील स्थानिक सशस्त्र गटाने इथिओपियन लष्कराला राजधानी मेकेलेमधून बाहेर काढण्यात यश मिळविले होते. त्यानंतर इथिओपियाने संघर्षबंदीची घोषणा केली होती व परदेशी सैन्य बाहेर पडल्याचीही माहिती दिली होती. मात्र इरिट्रिआचे सैन्य पुन्हा दाखल झाल्याने पुढील काळात तिगरेमधील संघर्षाचा नवा भडका उडण्याचे संकेत मिळाले आहेत.

इथिओपियाच्या तिगरे प्रांतात इरिट्रिआचे सैन्य घुसले आहे - अमेरिका व युरोपिय महासंघाचा इशाराइथिओपियाचे पंतप्रधान अबि अहमद यांनी सरकारविरोधात बंडाळीचे कारण पुढे करून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिगरे प्रांतावर हल्ला चढविला होता. या कारवाईसाठी त्यांनी शेजारी देश इरिट्रिआचेही सहाय्य घेतले होते. काही महिन्यांच्या संघर्षानंतर पंतप्रधान अहमद यांनी तिगरे प्रांतावर ताबा मिळविल्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा हा दावा फोल असल्याचे गेल्या काही महिन्यांमधील संघर्षातून समोर आले आहे.

तिगरेतील स्थानिक बंडखोर गटांनी राजधानी मेकेलेसह प्रांतातील महत्त्वाची शहरे ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. इथिओपियाच्या शेकडो जवानांना युद्धबंदी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचवेळी इरिट्रिआच्या सैनिकांनाही तिगरे प्रांताबाहेर पिटाळून लावले आहे. बंडखोर गटांनी संघर्षबंदीस नकार दिला असून तिगरेवर संपूर्ण ताबा मिळेपर्यंत संघर्ष कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे. बंडखोरांच्या काही तुकड्या शेजारी अम्हारा प्रांतातही घुसल्या असून काही भाग ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. याविरोधात अम्हारातील गटांनी प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे.

इथिओपियाच्या तिगरे प्रांतात इरिट्रिआचे सैन्य घुसले आहे - अमेरिका व युरोपिय महासंघाचा इशाराया पार्श्‍वभूमीवर इरिट्रिआचे सैन्य पुन्हा तिगरेसह इथिओपियाच्या इतर भागात दाखल होणे लक्ष वेधून घेणारे ठरते. काही दिवसांपूर्वी इथिओपियाचे पंतप्रधान अबि अहमद यांनी तुर्की व इरिट्रिआला भेट दिली होती. या दोन्ही भेटींमध्ये लष्करी सहकार्याचे करार झाल्याचे दावे सूत्रांकडून करण्यात आले आहेत. इथिओपियाचे लष्कर व इरिट्रिआच्या दाखल झालेल्या तुकड्या एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवरून तिगरेतील गटांना लक्ष्य करतील, असेही सांगण्यात येत आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून इरिट्रिअन लष्कराच्या हालचालींवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने इरिट्रिआच्या लष्करप्रमुखांसह इतर लष्करी अधिकाऱ्यांवर निर्बंध लादल्याची घोषणाही केली आहे. युरोपिय महासंघाने तिगरेसंदर्भात तयार केलेल्या एका अहवालात इरिट्रिअन लष्कराच्या हालचालींचा उल्लेख केला आहे. या अहवालात इरिट्रिअन लष्कर, तिगरेतील दोन शहरांमध्ये रणगाडे व सशस्त्र वाहनांसह दाखल झाल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे इथिओपियाच्या तिगरे भागात पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाचा भडका उडण्याचे संकेत मिळत असल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात आले आहे.

leave a reply