चीन व तालिबानच्या विरोधात इटीआयएम-आयएस हातमिळवणी करतील

- विश्‍लेषकांच्या दाव्याने चीनची चिंता वाढली

इटीआयएमबीजिंग/वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या पूर्ण माघारीला काही तास उलटत नाही तोच, तालिबानने इतर दहशतवादी संघटनांपासून स्वत:ला वेगळे काढावे, अशी मागणी चीनने केली. त्याचबरोबर चीनच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या ‘ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट-इटीआयएम’ला अफगाणिस्तानात थारा देणार नाही, याबाबत तालिबानने आश्‍वासन दिले होते, याची आठवण चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी करून दिली. या मोबदल्यात अफगाणिस्तानला अर्थसहाय्य पुरविण्यासाठी आपण तयार असल्याचे वेंबिन म्हणाले.

चीनच्या झिंजिआंग प्रांतातील उघुरवंशियांची ‘द ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट’(इटीआयएम) ही दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते. झिंजियांग चीनपासून वेगळा करून ईस्ट तुर्कस्तान प्रस्थापित करण्याची घोषणा इटीआयएमने केली होती. या संघटनेमध्ये 500 दहशतवादी असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने याआधी दिली होती. अफगाणिस्तानच्या कुंदूझ, तखर आणि बडाख्शन प्रांतात इटीआयएमचा प्रभावआहे. आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असणाऱ्या या इटीआयएमचा तालिबानने बंदोबस्त करावा, अशी मागणी चीनने केली होती.

इटीआयएमपण इटीआयएमच्या नेत्यांचे अल कायदाच्या दहशतवाद्यांबरोबर सहकार्य आहे. अशा या इटीआयएमवर कारवाई करणार नसल्याचे तालिबानने याआधी स्पष्ट केले होते. मात्र तालिबानला आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय व आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी चीनने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. चीनच्या या दबावाला बळी पडून तालिबान आपल्यावर हल्ले चढवू शकते किंवा आपल्या सदस्यांना चीनच्या हवाली करू शकते, अशी भीती इटीआयएमला सतावित आहे. असे झाले तर अफगाणिस्तान तसेच पाकिस्तानात नवा संघर्ष पेटेल, असा दावा लष्करी विश्‍लेषक करीत आहेत.

तर दुसऱ्या बाजूला तालिबानला हाताशी धरून अमेरिका ईटीआयएमला सहाय्य पुरवू शकेल, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. चीनला शह देण्यासाठी अमेरिकेने हा कट आखलेला असू शकतो, अशी चिंता चीनला वाटत आहे. पाकिस्तानातील काही विश्‍लेषक देखील अमेरिका व तालिबानमध्ये चीनच्या विरोधात हातमिळवणी झालेली असू शकते, असा संशय व्यक्त करीत आहेत. याआधी आयएस-खोरासन व इटीआयएम या दहशतवादी संघटनांमध्ये सहकार्य असल्याचा दावा अफगाणिस्तान व तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणांनी केला होता. चार वर्षांपूर्वी सिरियातील संघर्षात ‘इटीआयएम’च्या दहशतवाद्यांनी ‘आयएस’ला साथ दिली होती. त्यावेळी चीनने चिंता व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत, तालिबान इटीआयएमबाबत कोणती भूमिका स्वीकारील, यावर चीनची नजर रोखलेली आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानच्या प्रवक्त्याने इटीआयएमबाबत चीनने व्यक्त केलेल्या चिंतेवर बोलताना, चीनने आपल्या धोरणावर फेरविचार करण्याची गरज असल्याचे सूचक विधान केले होते.

leave a reply