कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी युरोपने ‘पर्पेच्युअल बॉण्ड्स’ काढावेत – अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सॉरोस यांची सूचना

ब्रुसेल्स – कोरोना साथीमुळे येणारी संभाव्य आर्थिक मंदी टाळण्यासाठी युरोपने ‘पर्पेच्युअल बॉण्ड्स’ प्रकारातील रोख्यांचा वापर करावा अशी सूचना अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात युरोपमधील प्रमुख देश फ्रान्स व जर्मनी यांनी कोरोना साथीचा आर्थिक फटका टाळण्यासाठी पाचशे अब्ज युरोच्या विशेष निधीची घोषणा केली होती. यासंदर्भात बोलताना सोरोस यांनी एका डच दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत विशेष निधीऐवजी रोख्यांचा वापर करावा, असे मत मांडले.

कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्‍वभूमीवर युरोपीय महासंघाचा अंत होऊ शकतो असे सोरोस यांनी नुकत्याच एका ब्रिटिश दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. ‘युरोपिय महासंघ हा एक संघटित गट म्हणून आजही अपूर्ण आहे त्याचवेळी तो कायदे व नियमांवर जास्त भर देतो. कायदे व त्यावर आधारित न्यायाचे चक्र खूपच हळू चालते. मात्र त्या तुलनेत कोरोनासारखी साथ अत्यंत वेगाने पसरत असून त्याला तोंड देण्यास युरोप अयशस्वी ठरेल व त्यातच महासंघाचा अंत होईल’, असा दावा गुंतवणूकदार सोरोस यांनी केला होता.

युरोपात २० लाख लोकांना कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाला असून त्यात आतापर्यंत एक लाख ७३ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. युरोपमधील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली व स्पेन या देशांमध्ये साथीने हाहाकार उडवला आहे. या साथीचे आर्थिक परिणामही समोर येण्यास सुरुवात झाली असून जगातील बहुतांश प्रमुख गट व संस्थांनी युरोपला आर्थिक मंदीचा जबरदस्त फटका बसेल, असे भाकित वर्तविले आहे. युरोपमधील आघाडीची अर्थव्यवस्था असणाऱ्या जर्मनीने मंदीची घोषणाही केली आहे.

या पार्श्वभूमीवर, युरोपियन अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी गेल्या आठवड्यात विशेष निधीची घोषणा करण्यात आली होती. जर्मनी व फ्रान्स या दोन देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ‘रिकव्हरी फंड’ या नावाने निधीची घोषणा करताना याअंतर्गत युरोपमधील विविध देशांना आर्थिक अनुदान देण्यात येईल असे म्हटले होते. मात्र त्याला काही युरोपियन देशांनीच विरोध केला असून निधी कर्जाच्या रूपातच द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे. या मुद्द्यावर युरोपीय महासंघ येत्या काही दिवसात अंतिम प्रस्ताव मांडणार असून त्यापूर्वीच जॉर्ज सॉरोस यांनी केलेली सूचना लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांनी, नेदरलँड मधील एक दैनिक ‘डेर टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत अमेरिका व ब्रिटन यांनी यापूर्वी वापरलेल्या प्रकारातील रोख्यांचा वापर करावा असे म्हटले आहे. ‘पर्प’ किंवा ‘कन्सोल्स’ या नावानेही ओळखण्यात येणाऱ्या या रोख्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची अंतिम मुदत अर्थात ‘डेट ऑफ मॅच्युरिटी’ निश्चित केलेली नसते. या प्रकारच्या रोख्यांमध्ये फक्त दरवर्षी नियमितपणे व्याज भरणे बंधनकारक आहे.

डच दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत गुंतवणूकदार सोरोस यांनी युरोपीय महासंघाने एक ट्रिलियन युरोचे रोखे ‘ ‘पर्पेच्युअल बॉण्ड्स’ प्रकारात विक्रीसाठी काढावेत असे म्हटले आहे. या रोख्यांवर ०.५ टक्के व्याज आकारल्यास दरवर्षी फक्त पाच अब्ज युरो इतकेच व्याज भरावे लागेल असे सोरोस यांनी सांगितले. रोखे एकत्रित विक्रीला काढण्याची गरज नसून टप्प्याटप्प्याने त्याची विक्री करता येईल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्सुक असलेले अनेक जण त्याचा लाभ घेऊ शकतील, असा दावा सोरोस यांनी मुलाखतीत केला.

‘पर्पेच्युअल बॉण्ड्स’ या प्रकारातील रोख्यांचा वापर यापूर्वी अमेरिका तसेच ब्रिटनने केल्याचे समोर आले आहे. ब्रिटनने फ्रेंच सम्राट नेपोलियन यांच्या विरोधातील युद्धामध्ये तसेच क्रिमियन युद्ध व पहिल्या महायुद्धादरम्यान या रोख्यांचा वापर केला होता. तर अमेरिकेने १८७०च्या दशकात ‘सिव्हिल वॉर’साठी या रोख्यांचा वापर केला होता.

युरोपिय महासंघ या आठवड्यात ‘रिकव्हरी फंड’ संदर्भातील अंतिम प्रस्ताव सादर करणार आहे. त्यापूर्वी युरोपीय महासंघातील सदस्य देशांमध्ये याबाबत असणारे मतभेद समोर आले आहेत. अशा स्थितीत अब्जाधीश गुंतवणूकदार सोरोस यांची सूचना युरोपीय देशांमधील मतभेद अधिक तीव्र करणारी ठरू शकते.

leave a reply