ब्रिटनसह युरोप, यूएई व व्हिएतनामची पाकिस्तानी वैमानिकांवर कारवाई

लंडन/दुबई/हनोई – पाकिस्तानी वैमानिकांकडे बनावट लायसन्स असल्याची माहिती उघड झाल्यानंतर पाकिस्तानवर नामुष्की ओढावली आहे. ब्रिटन, युरोपीय महासंघ, युएई आणि व्हिएतनामने पाकिस्तानची विमानसेवा कंपनी ‘पीआयए’ची उड्डाणे रद्द केली आहे. त्याचबरोबर या देशांनी पाकिस्तानी वैमानिकांचे लायसन्स रद्द केले आहेत. जगभरातून पाकिस्तानच्या सुरू असलेल्या नाचक्कीमुळे खवळलेल्या पाकिस्तानी माध्यमांनी इम्रान खान सरकारवर कोरडे ओढले आहेत.

वैमानिकांवर कारवाई

२२ मे रोजी पाकिस्तानच्या कराची शहरात प्रवासी विमानाला झालेल्या दुर्घटनेत ९७ जणांचा बळी गेला होता. या दुर्घटनेच्या चौकशीत काही धक्कादायक माहिती समोर आली होती. विमान हवेत असताना पाकिस्तानी वैमानिक आपल्या सहवैमानिकासह कोरोनावर चर्चा करीत असल्याचे उघड झाले होते. पाकिस्तानच्या संसदेत या घटनेची माहिती देत असताना पाकिस्तानी मंत्र्यांनी काही जगाला चकीत करणारी माहिती दिली. पाकिस्तानची राष्ट्रीय विमानसेवा कंपनी ‘पीआयए’मधील ८६० वैमानिकांपैकी २३० वैमानिकांकडील लायसन्स बनावट असल्याचे पाकिस्तानी मंत्र्यांनी जाहीर केले. पाकिस्तानी मंत्र्यांच्या या आत्मघाती विधानांचे पडसाद पुढच्या काही तासात जगभरात उमटले.

युरोपीय महासंघाच्या ‘एव्हिएशन सेफ्टी एजन्सी’ने पाकिस्तानी वैमानिकांच्या बनावट लायसन्सचा मुद्दा अधोरेखित करून ‘पीआयए’च्या विमानांना यूरोपच्या हद्दीत प्रवेश देणार नसल्याचे जाहीर केले. युरोपीय देशांच्या सुरक्षेसाठी पुढील सहा महिने ‘पीआयए’वर ही बंदी असेल, असे महासंघाने स्पष्ट केले. युरोपीय महासंघाच्या या निर्णयाचे मोठे परिणाम पाकिस्तानच्या विमानसेवर होणार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे याआधीच पाकिस्तानची विमानसेवा खंडीत झाली आहे. त्यातच या निर्णयामुळे यापुढे पाकिस्तानला फक्त युरोपच नाही तर युरोपमार्गे अमेरिका व कॅनडाला जाणाऱ्या विमानसेवाही रद्द कराव्या लागू शकतात किंवा लांबच्या पल्ल्याचा मार्ग स्वीकारावा लावू शकतो. असे केल्यास पाकिस्तानच्या विमानसेवेवर अतिरिक्त आर्थिक ताण येईल, अशी चिंता पाकिस्तानला सतावित आहे.

वैमानिकांवर कारवाई

युरोपीय महासंघाची ‘पीआयए’वरील बंदी तात्पुरती आहे. पण ब्रिटनने अनिश्चित काळासाठी पाकिस्तानच्या विमानांना लंडन, बर्मिंगहॅम आणि मॅंचेस्टर या शहरांमध्ये उतरू देणार नसल्याचे ठणकावले आहे. तर दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी विमानांना परवानगी नाकारणाऱ्या ‘यूएई’ने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या देशातील विमान कंपन्यांमध्ये सेवेत असलेल्या पाकिस्तानी वैमानिक आणि इंजिनियर्सच्या चौकशीचे आदेश यूएई’ने दिले आहेत. ‘यूएई’चा या निर्णयाचे अनुकरण आखातातील इतर देशांकडून केले जाण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास पाकिस्तानच्या विमानांना आखाताची हवाईहद्द बंद केली जाऊ शकते. आग्नेय आशियातील व्हिएतनामने देखील आपल्या विमान कंपन्यांमधील पाकिस्तानी वंशिय वैमानिकांना सेवेतून कमी केले आहे. त्याचबरोबर सदर वैमानिक आणि इंजिनिअर्सच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानच्या मंत्र्यांनी ‘पीआयए’मधील बनावट लायसन्स असणाऱ्या वैमानिकांची माहिती उघड करण्याची काय आवश्यकता होती, असा सवाल पाकिस्तानचे संतप्त पत्रकार करीत आहेत. याच्यामुळे पाकिस्तानला हजारो कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागेल आणि सर्वात मोठी बाब म्हणजे यामुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. यातून सावरण्यासाठी बरेच महिने जावे लागतील, अशी खंत पाकिस्तानी पत्रकारांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार अशारितीने पाकिस्तानची आणखी किती अप्रतिष्ठा करीत राहणार, असा संतप्त सवालही केला जात आहे.

leave a reply